मुंबई : जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून ग्रीन मोक्ष फाऊंडेशन आणि एम पूर्व विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने देवनार येथे वृक्षारोपणाचा कार्यक्रम पार पडला.
एम पूर्व विभागाचे सहाय्यक आयुक्त उबाले, सहाय्यक उद्यान अधिकारी शरद बागुल आणि वृक्ष मदतनीस पोपट वाळुंज यांच्या मार्गदर्शनाखाली देवनार म्युनिसिपल कॉलनी येथील भूपेश उद्यान, श्री स्वामी समर्थ उद्यानात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
गोवंडी येथील ज्ञान साधना योग सेवा संस्था आणि ग्रीन मोक्ष फाऊंडेशनचे पदाधिकारी शुभांगी जाधव, महेश अधाटे, कुंडलिक अधाटे, हेमांगी जोशी, मनीषा दळवी, तिथी जोशी, मंत्र, अध्याय यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मेहनत घेतली.
अंतिम संस्काराकरिता लागणारी झाडे वाचविणे, विद्युतदाहिनी पद्धतीचा अवलंब करणे याबाबत जनजागृती करण्यासाठी ग्रीन मोक्ष फाऊंडेशनतर्फे विविध उपक्रम राबविले जातात. २०१४मध्ये स्थापन झालेल्या या संस्थेतर्फे पर्यावरण संवर्धन, पूरग्रस्तांसाठी मदतकार्य केले जाते. त्याचप्रमाणे दिव्यांगांना स्वावलंबी जीवन जगण्याच्या दृष्टीने टेलिफोन बूथ, घरघंटी, शिलाई मशीन अशी सरकारी मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जातात.
मराठी भाषेच्या संवर्धनासाठी ‘ग्रंथ तुमच्या दारी’ या संस्थेच्या मदतीने मराठी पुस्तकांचे ग्रंथालयही सुरू करण्यात आले आहे. तसेच कोरोनाग्रस्त रुग्णांना स्वस्त दरात औषधे मिळवून देण्यासाठीही ग्रीन मोक्ष फाऊंडेशनचे सभासद झटत आहेत. समाजाचा विकास होण्याकरिता सतत प्रयत्नशील राहणे, हा संस्थेचा उद्देश आहे, अशी माहिती देण्यात आली.