Join us

पंतप्रधानांच्या आवाहनाला प्रतिसाद देत राम नाईक यांचे वृक्षमित्र कट्ट्यावर वृक्षारोपण

By मनोहर कुंभेजकर | Published: July 07, 2024 4:15 PM

राम नाईक गेली ६० वर्षे जिथे राहतात त्या जयप्रकाश नगर भागातील असल्याने यावेळी उद्यानासंबंधीच्या अनेक जुन्या आठवणींना उजाळा दिला.

मुंबई - वृक्षमित्र कट्टा, गोरेगाव करीत असलेल्या वृक्ष संवर्धन व वृक्षारोपणासंबंधीच्या कामामुळे जनजागृतीबरोबरच वृक्षप्रेमी व वृक्ष मित्रांसाठी प्रेरणादायी तर आहेच, पण त्यामुळेच मलाही पंतप्रधानांच्या आवाहनानुसार शिसवी वृक्षाचे रोपण करता आले, असे गौरवोद्गार ‘पद्मभूषण’ने सन्मानित उत्तर प्रदेशचे माजी राज्यपाल राम नाईक यांनी काढले.

वृक्षमित्र कट्टा, गोरेगावच्या  दुसऱ्या वर्धापन दिनानिमित्त जयप्रकाश नारायण उद्यान, गोरेगाव पूर्व येथे आज आयोजित कार्यक्रमात राम नाईक बोलत होते. गेली दोन वर्षे ‘वृक्षमित्र कट्टा’ अभियानांतर्गत महिन्यातील एका रविवारी  जयप्रकाश नारायण उद्यानात वृक्षारोपण करण्यात येते, तसेच निसर्गप्रेमी मंडळींना रोपे, वृक्ष यांचे संवर्धन, शेती आदि विषयांबाबत विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. 

सदर उद्यान हे राम नाईक गेली ६० वर्षे जिथे राहतात त्या जयप्रकाश नगर भागातील असल्याने यावेळी उद्यानासंबंधीच्या अनेक जुन्या आठवणींना उजाळा दिला. सदर जागी उद्यान होण्यापूर्वी प्रसिद्ध गायक सुधीर फडके यांच्या गीत रामायणाचा कार्यक्रम झाला होता असेही  त्यांनी सांगितले.

यावेळी त्यांच्या यांच्या सोबत गौ आधारित शेतीतज्ञ किरण लेले यांनीही वृक्षाचे रोपण केले व उपस्थितांना गौ आधारित शेती,  ग्राम विकास व शहरातील वृक्ष संवर्धन या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले.

गेली दोन वर्ष ‘वृक्षमित्र कट्टा’ अभियान अजित वर्तक व स्थानिक कार्यकर्ते गोरेगावात चालवत आहे. दुसऱ्या वर्धापन दिनाच्या या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वर्तक यांनी केले.

टॅग्स :मुंबई