मुंबई : अरबी समुद्रात उठलेल्या वायू या चक्रीवादळामुळे वेगाने वाहणारे वारे व पाऊस यामुळे मुंबईत ठिकठिकाणी पडझडीच्या घटना घडल्या असून, १३ आणि १४ जूनदरम्यान १५० हून अधिक ठिकाणी झाडे कोसळली आहेत. महत्त्वाचे म्हणजे झाडे कोसळून जोगेश्वरी, मालाड, गोवंडी येथे झालेल्या दुर्घटनांत तीन मुंबईकरांना जीव गमवावा लागला. शैलेश मोहनलाल राठोड, अनिल नामदेव घोसाळकर, नितीन विष्णू शिरवळकर अशी मृतांची नावे आहेत.
१३ जून रोजी दुपारी एकच्या सुमारास जोगेश्वरी पूर्वेकडील तक्षशीला सोसायटीमधील इमारत क्रमांक १९ येथे झाड कोसळून झालेल्या दुर्घटनेत अनिल नामदेव घोसाळकर (४८) हे जखमी झाले होते. त्यांना होली स्पिरिट रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. मात्र १४ जून रोजीच्या पहाटे साडेचार वाजता घोसाळकर यांचा मृत्यू झाला. १४ जून रोजी सकाळी साडेसहाच्या सुमारास मालाड पश्चिम येथील नारीयलवाला कॉलनी येथील खासगी कम्पाउंडमधील झाडाची फांदी पडून झालेल्या दुर्घटनेत शैलेश मोहनलाल राठोड (३८) हे जखमी झाले. जखमी राठोड यांना कांदिवली येथील शताब्दी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. मात्र येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. लेखराज यांनी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे निदान केले.
शुक्रवारी दुपारी सव्वाचारच्या सुमारास गोवंडीतील अणुशक्तीनगर परिसरातही झाड कोसळून झालेल्या दुर्घटनेत बीआरसीचे कर्मचारी नितीन विष्णू शिरवळकर जखमी झाले. त्यांना बीएआरसी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. महत्त्वाचे म्हणजे हे झाड ज्या ठिकाणी कोसळले, त्या बीएआरसीमधील ईआरसी, गार्डन सेक्शनला महापालिकेने धोकादायक झाडांची छाटणी करण्याचे पत्र यापूर्वीच दिले होते.‘वायू’ने दिशा बदलली; पुन्हा अलर्टअरबी समुद्रात पश्चिम दिशेला सरकलेले वायू चक्रीवादळ यू-टर्न घेत कच्छ किनारी धडकू शकते, असा अंदाज केंद्रीय पृथ्वी विज्ञान मंत्रालयाकडून व्यक्त करण्यात आला आहे. चक्रीवादळ दोन दिवसांत कच्छ किनारी धडकू शकते, असे मंत्रालयाचे म्हणणे आहे. यू-टर्ननंतर वादळाची तीव्रता कमी असली तरी बदलत्या स्थितीबाबत गुजरातला सतर्क करण्यात आले आहे. दरम्यान, वादळ पश्चिमेला म्हणजे ओमानकडे सरकल्याने सुटकेचा नि:श्वास टाकण्यात आला होता. मात्र आता नवा अलर्ट जारी करण्यात आला आहे.तक्षशीला सोसायटी येथील दुर्घटना घडण्यापूर्वी २२ एप्रिल २०१९ रोजी पालिकेच्या के/पूर्व विभागाने संबंधित सोसायटीला पत्र पाठविले होते. सोसायटीच्या आवारातील मृत, धोकादायक, रस्त्यावर झुकलेल्या झाडांची, फांद्यांची छाटणी करावी. या झाडांमुळे भविष्यातील हानीस सोसायटी जबाबदार राहील, असे पत्रात नमूद होते.च्१३ जून रोजी मुंबई शहरात ४३, पूर्व उपनगरात २९ आणि पश्चिम उपनगरात ५९ अशा एकूण १३१ ठिकाणी झाडे/फांद्या पडण्याच्या तक्रारी मुंबई महापालिकेच्या आपत्कालीन नियंत्रण कक्षाला प्राप्त झाल्या.च्१४ जून रोजी मुंबई शहरात २६, पूर्व उपनगरात २६ आणि पश्चिम उपनगरात ४८ अशा एकूण १०० ठिकाणी झाडे/फांद्या कोसळल्याच्या घटना घडल्या.