मुंबई : राज्यात प्लाझ्मा उपचार पद्धतीचा व्यापक प्रमाणात प्रयोग करणारे देशातील पहिले राज्य ठरले आहे. तसेच जगातली सर्वात मोठी प्लाझ्मा थेरपीची ट्रायल महाराष्ट्रात झाली आहे. राज्यात २३ ठिकाणी वैद्यकीय महाविद्यालये, पालिका रुग्णालयात या थेरपीचा वापर करण्यास केंद्र सरकारने मान्यता दिली आहे. यापैकी १७ ठिकाणी ही उपचार पद्धती कोविड रुग्णांसाठी सुरू करण्यात आली, त्यानंतर आता लवकरच मुंबईतील परळच्या केईएम रुग्णालयात प्लाज्मा बँक सुरू होईल.
केईएम रुग्णालयात येत्या काही दिवसांमध्ये प्लाझ्मा बँक सुरू होणार असून त्यानंतर पालिकेच्या अन्य रुग्णालयांमध्येही अशा स्वरुपाची बँक सुरु करण्याचा पालिका प्रशासनाचा मानस आहे. केईएम रुग्णालय प्रशासनासह एका संस्थेच्या सहाय्याने याची सुरुवात केली जाणार असून त्यांचे कर्मचारी प्लाझ्मा दानासाठी सामान्यांशी संपर्क साधतील. शिवाय, प्लाझ्मा दानाचे महत्त्व पटवून देण्यास मदत करतील. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे, दान केलेला प्लाझ्मा किमान एक वर्ष संकलित करण्याची तरतूद या बँकेत असेल, अशी माहिती केईएम रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. हेमंत देशमुख यांनी दिली.सामान्यांशी संपर्कपालिका रुग्णालयांमध्ये प्लाझ्मा बँक सुरु करण्यासाठी अन्न व औषध प्रशासन विभागाची परवानगी गरजेची आहे. त्यामुळे अशा स्वरुपाचे प्रस्ताव आले असून लवकरच अंतिम निर्णय घेऊन अंमलबजावणी करण्यात येईल. तसेच, प्लाझ्मा दानाचे प्रमाण वाढविण्यासाठी पालिका प्रशासनही जनजागृती व अन्य माध्यमातून सामान्यांशी संपर्क करेल असेही डॉ. देशमुख यांनी नमूद केले.प्लाझ्मा कोण देऊ शकतो? : जी व्यक्ती १८ ते ६० वयोगटातील असेल, हिमोग्लोबिन १२.५ टक्के असेल, वजन साधारणपणे ५० किलोपेक्षा जास्त असेल, कोमॉबीर्डीटी नसेल म्हणजेच रक्तदाब, मधुमेह, कर्करोग, मूत्रपिंड, हृदयविकार नसतील अशा लोकांचा प्लाझ्मा घेता येतो. जे लोक कोरोनाबाधित बरे होऊन २८ दिवस झाले आहेत त्यांना प्लाझ्मा दान करता येतो. प्लाझ्मा देताना प्लाझ्माफेरीसीस यंत्रातून काढला जातो. यामध्ये जो दाता आहे त्याचा प्लाझ्मा कम्पलसरी ट्रायटेट केला जातो आणि त्या ठिकाणी १:६४ अशा पद्धतीने ते असेल तर तो प्लाझ्मा पात्र असतो. एसबीटीसी (स्टेट ब्लड ट्रन्सफ्युजन कौन्सिल) येथे भेट देऊन ज्याला प्लाझ्मा दान करायचाय आणि ज्याला तो हवा आहे, अशांची नोंद करता येते.