दुसऱ्या कोरोना लाटेच्या पार्श्वभूमीवर प्लाझ्मादानाचे वैद्यकीय तज्ज्ञांचे आवाहन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2021 04:06 AM2021-04-05T04:06:40+5:302021-04-05T04:06:40+5:30
मुंबई - मुंबईसह राज्यभरात कोरोनाची दुसरी लाट वेगाने पसरत आहे. या पार्श्वभूमीवर राज्य शासन आणि स्थानिक यंत्रणा विविध पातळ्यांवर ...
मुंबई - मुंबईसह राज्यभरात कोरोनाची दुसरी लाट वेगाने पसरत आहे. या पार्श्वभूमीवर राज्य शासन आणि स्थानिक यंत्रणा विविध पातळ्यांवर प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रयत्न करीत आहे. त्याचाच भाग म्हणून प्लाझ्मादात्यांनी पुढाकार घेण्याचे आवाहन वैद्यकीय तज्ज्ञांनी केले आहे. प्लाझ्मा उपचारपद्धतीच्या माध्यमातून शरीरात ॲण्टिबाॅडी (प्रतिपिंड) तयार होण्यास मदत होते.
प्लाझ्मा थेरपीमध्ये कोरोनातून पूर्णपणे ठीक झालेल्या व्यक्तीच्या शरीरातील रक्त घेतले जाते. रक्ताचा वापर करून ॲण्टिबॉडीजयुक्त प्लाझ्मा वेगळे केले जातात. यानंतर हा प्लाझ्मा कोरोनाची लागण झालेल्या रुग्णाच्या शरीरात इंजेक्ट केला जातो. जेव्हा शरीर कोणत्याही बॅक्टेरियाच्या संपर्कात येते, तेव्हा रोगप्रतिकारक यंत्रणा स्वयंचलितपणे सक्रिय होते आणि ॲण्टिबॉडीज मुक्त होतात. कोरोना विषाणूच्या संसर्गापासून बरे झालेल्या रुग्णांच्या रक्तातील प्लाझ्मामध्ये ॲण्टिबॉडीज असतात, ज्या आधी कोरोनाशी लढलेल्या असतात. हा प्लाझ्मा कोणत्या रुग्णाला द्यायचा, हे डॉक्टर्स ठरवितात. मध्यम व तीव्र स्वरूपाची लक्षणे असलेल्या व नेहमीच्या औषधोपचारांनी बरा न होणारा, ऑक्सिजनची गरज असणारा रुग्ण निवडला जातो.
प्लाझ्मा देणे हे एक खूप श्रेष्ठदान आहे, हा विश्वास दात्याला वाटणे हे महत्त्वाचे आहे. त्यासाठी त्याचे प्रबोधन करणे, प्रोत्साहित करणे, प्लाझ्मादानासाठी प्रवृत्त करणे महत्त्वाचे आहे. काही स्वयंसेवी संस्थांनी त्यामध्ये सहभाग घेऊन या कार्यक्रमाला प्रतिसाद दिला, तर नक्कीच प्लाझ्मादानाच्या कार्याला हातभार लागू शकतो. त्यामुळे जास्तीतजास्त दात्यांनी पुढाकार घेऊन प्लाझ्मादान करावे, असा सल्ला डॉ. सारंग दोशी यांनी दिला.
प्लाझ्मा कसे संकलित केले जाते?
प्लाझ्माफेरेसिस नावाच्या प्रक्रियेद्वारे रक्तातील प्लाझ्मा गोळा केला जातो. या प्रक्रियेस सुमारे ४५ मिनिटे वेळ लागतो. या प्रक्रियेदरम्यान रक्त काढले जाते आणि प्लाझ्मा वेगळे केले जातात. संकलित केले जाण्यासाठी प्लाझ्माची सामान्य मात्रा ३०० मिली ते ६०० मिलिमीटर दरम्यान असते. एकदा काढलेला प्लाझ्मा १० डिग्री सेल्सिअस तापमानात थंड वातावरणात ठेवला जातो. प्लाझ्मा काढण्याच्या तारखेपासून १२ महिन्यांपर्यंत संग्रहित केला जाऊ शकतो.