मुंबई : धोकादायक पुलांच्या यादीतील दादर पूर्व-पश्चिमेला जोडणाऱ्या महत्त्वाच्या टिळक पुलाच्या प्लास्टरचा भाग बुधवारी दुपारी पडला. सुदैवाने या दुर्घटनेत जीवितहानी किंवा कोणीही जखमी झालेले नाही. मात्र पुलाखालील भाग बंद करून तत्काळ पाहणी करण्यात आली. ही घटना किरकोळ असली तरी खबरदारी म्हणून स्ट्रक्चरल आॅडिटरमार्फत या पुलाची पाहणी करण्यात आली.दादर पूर्व येथे १९२३ मध्ये टिळक पूल बांधण्यात आला आहे. २०१८ मध्ये अंधेरी येथील गोखले पूल कोसळल्यानंतर मुंबईतील सर्व पुलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला. १९२३ मध्ये बांधण्यात आलेला दादर येथील टिळक पूलही धोकादायक बनल्याने त्याच्या दुरुस्तीची मागणी नगरसेवकांकडून वारंवार केली जात आहे. दरम्यान, बुधवारी दुपारी दीडच्या सुमारास टिळक पुलाच्या बाजूला असलेल्या पदपथाचा एक मीटर बाय एक मीटर प्लास्टरचा भाग बुधवारी दुपारी कोसळला.याबाबत समजताच जी दक्षिण विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत आढावा घेतला. दादर पश्चिम व पूर्वेला जोडणाºया या पुलाचा भाग एफ उत्तर विभागाच्या अखत्यारीत आहे. त्यामुळे एफ उत्तर विभागातील अधिकाºयांनी त्या ठिकाणी पाहणी करून पुलाखालील भाग बॅरिकेट्स उभे करून तेथे लोकांची ये-जा बंद करण्यात आली. तसेच तातडीने दुरुस्तीचे कामही सुरू करण्यात आले.पूल विभागाच्या अधिकाºयांनीही स्ट्रक्चरल आॅडिटरला बोलावून या पुलाच्या सुरक्षेची खात्री करून घेतली. त्यानंतर या पुलावरील वाहतूक सुरू करण्यात आली.>आॅडिटमध्ये सुचविली होती मोठी दुरुस्ती१४ मार्च रोजी छत्रपती शिवाजी टर्मिनस येथील हिमालय पादचारी पूल कोसळून सात लोकांचा मृत्यू झाल्यानंतर सर्व पुलांचे पुन्हा स्ट्रक्चरल आॅडिट करण्यात आले. त्यानुसार अति धोकादायक ठरलेले पूल वाहतुकीसाठी बंद करून पाडण्यात येत आहेत. तर काही पुलांची मोठी दुरुस्ती सुचविण्यात आली आहे. यापैकी टिळक पूल एक आहे. दरम्यान, स्ट्रक्चरल आॅडिटमध्ये सुचवल्याप्रमाणे या पुलाच्या मोठ्या दुरुस्तीचे काम अद्याप सुरूझालेले नाही.>१९२३ मध्ये बांधण्यात आलेला लोकमान्य टिळक पूल दादर पूर्व आणि पश्चिमेला जोडणारा महत्त्वाचा पूल आहे.किंग्सवे रोडला जोडण्यात आलेला हा पूल स्थानिकांमध्ये किंग्सवे पूल म्हणून ओळखला जायचा.कालांतराने या रस्त्याचे नामकरण आंबेडकर रोड म्हणून झाले. दादर पूर्व (खोदादाद सर्कल) ते दादर पश्चिमेला जोडणारा हा प्रमुख पूल आहे.>दुरुस्ती लवकरच : पुलावरील पदपथाचा एक बाय एक मीटर प्लास्टरचा भाग कोसळला. पूल विभाग, एफ उत्तर विभागातील अभियंत्यांच्या पथकाने पुलाची पाहणी केली. स्ट्रक्चरल आॅडिटरच्या शिफारशीनुसार पुलाची दुरुस्ती लवकरच होणार आहे. या कामाची प्रक्रिया सुरू असून लवकरच कामाचे कार्यादेश निघतील, असे एफ उत्तर विभागाचे सहायक आयुक्त गजानन बेल्लाळे यांनी सांगितले.
टिळक पुलावरील पदपथाचे प्लास्टर पडले
By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2019 5:49 AM