मोहीम थंडावली, वर्षभरानंतर प्लास्टिक पुन्हा बाजारात
By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2019 04:37 AM2019-06-23T04:37:25+5:302019-06-23T04:37:40+5:30
प्लास्टिकचा वापर बंद व्हावा, यासाठी विशेष पथक स्थापन करून कारवाईही सुरू झाली. मात्र, या मोहिमेला वर्ष पूर्ण होत असताना प्लॅस्टिकच्या पिशव्या पुन्हा बाजारात डोकावू लागल्या आहेत.
- शेफाली परब-पंडित
मुंबई - प्लास्टिकला मुंबईतून हद्दपार करण्याचा विडा मुंबई महापालिकेने वर्षभरापूर्वी उचलला. प्लास्टिकचा वापर बंद व्हावा, यासाठी विशेष पथक स्थापन करून कारवाईही सुरू झाली. मात्र, या मोहिमेला वर्ष पूर्ण होत असताना प्लॅस्टिकच्या पिशव्या पुन्हा बाजारात डोकावू लागल्या आहेत. दुकानदारांना चाप बसला, तरी ग्राहकांच्या हातात प्लॅस्टिक पिशव्या दिसत आहेत़ पालिकेचे विशेष पथक क्वचितच कारवाई करताना दिसून येत आहेत.
गेल्या वर्षी २३ जूनपासून संपूर्ण राज्यात प्लॅस्टिक व थर्माेकोलवर बंदी लागू करण्यात आली. मुंबईत या कारवाईची जबाबदारी महापालिकेवर असल्याने सुरुवातीच्या काळात प्लॅस्टिकविरोधी मोहीम तेजीत सुरू होती. प्लॅस्टिकचा वापर करणारे दुकानदार, फेरीवाले आणि व्यावसायिकांवर दंडात्मक कारवाई होऊ लागली. या कारवाईतून ग्राहकांना म्हणजेच मुंबईकरांना तूर्तास वगळण्यात आले आहे. दंडाची रक्कम तब्बल पाच हजार रुपए असल्याने, दुकानदार प्लॅस्टिक पिशव्या देण्यास टाळू लागले.
काही महिन्यांतच ग्राहकांच्या हातात कापडी पिशव्या दिसू लागल्या. वर्षभरात ६० हजार किलो प्लॅस्टिक आणि तीन कोटी ३९ लाख रुपये दंड पालिकेने दुकानदारांकडून वसूल केला. मात्र, सहा महिन्यांनंतर ही कारवाई थंडावली आणि हळूहळू प्लॅस्टिकच्या पिशव्या बाहेर येऊ लागल्या. रस्त्यावरील विक्रेते भाजी, फुले, फळे सर्रास प्लॅस्टिकच्या पिशव्यांमधून ग्राहकांना देऊ लागले आहेत. मात्र, लोकसभा निवडणुकीच्या कामात पथकातील कर्मचारी व्यस्त असल्याने कारवाईला ब्रेक लागला होता, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.
अशी होते कारवाई
मुंबईभरात ३१० निरीक्षकांचे पथक तयार करून प्लॅस्टिकवर कारवाई करण्यात येत आहे. या निरीक्षकांच्या ‘ब्ल्यू स्कॉड’मध्ये मार्केट, परवाना आणि आस्थापना विभागातील कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. निळा कोट आणि काळी टोपी घातलेल्या या निरीक्षकांकडून कारवाई करण्यात येत आहे. या कारवाईत प्रत्येक दिवशी ६० हजार ते एक लाखांपर्यंत सरासरी दंड वसूल करण्यात येतो.
कारवाई सुरूच राहणार...
प्लॅस्टिकवरील कारवाई थंडावल्याबाबत विचारले असता, कारवाई सुरूच असून, यापुढेही कायम राहणार, असे उपायुक्त आनंद वागराळकर यांनी सांगितले.
वर्षभरात ६० हजार ४८९ किलो प्लॅस्टिक जप्त करण्यात आले. तीन कोटी ३९ लाख रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.
दुकानदार व उत्पादक प्रतिबंधित प्लॅस्टिकची विक्री करीत असल्यास पालिकेच्या पथकामार्फत कारवाई करण्यात येते. या पथकात दुकान व आस्थापन विभाग, परवाना आणि बाजार या दुकानातील कर्मचारी-अधिकाºयांचा समावेश आहे.
कोणत्या प्लॅस्टिकवर बंदी आहे, याबाबत सर्वसामान्य विक्रेते आणि नागरिकांमध्ये अद्याप संभम्र आहे.
विभाग दंड वसूल प्लॅस्टिक जप्त
दुकान २.३० कोटी ४५,३७३ किलो
व आस्थापना
परवाना ९३ लाख १४६२३ किलो
बाजार १५ लाख ५४७ किलो
दंडाची रक्कम ‘जैसे थे’च....
पहिल्या कारवाईतच दंडाची रक्कम पाच हजार रुपयांऐवजी दोनशे रुपये करण्याचा प्रस्ताव पालिका प्रशासनाने तयार केला होता. दंडाची रक्कम कमी करण्याचा अधिकार राज्य सरकारला असल्याचे निदर्शनास आणून विधि समितीने हा प्रस्ताव फेटाळला. प्लॅस्टिक आढळल्यास पहिल्या वेळेला पाच हजार रुपये दंड आकारण्यात येतो, तर दुसºया वेळी दहा हजार रुपए आहे.
प्लास्टिकबंदीला एक वर्ष उलटूनही परिस्थिती ‘जैसे-थे’
मुंबई : आज प्लॅस्टिक बंदीला एक वर्ष पूर्ण झाले असले तरीही परिस्थिती ‘जैसे-थे’. खेडेगावात जास्त प्रमाणात तर शहरात तुरळक प्रमाणात प्लॅस्टिकचा वापर सुरू आहे. त्यामुळे सरकारच्या प्लॅस्टिकबंदीचा निर्णय पूर्णपणे फसला आहे. प्लॅस्टिक हे वॉटरप्रुफ, स्वस्त आणि वजनाने हलकी असून आकर्षक आहे. यामुळे प्लॅस्टिकला पहिले महत्त्व दिले जाते. याशिवाय प्लॅस्टिकबंदीची जनजागृतीही ज्या भागांत व्हायला हवी होती, तिथपर्यंत पोहोचलेली नाही. परिणामी, नागरिकांना प्लॅस्टिकऐवजी पर्यायी वस्तूंचा आधार न मिळाल्याने प्लॅस्टिकचा वापर केला जातोय.
पर्यावरणतज्ज्ञ अविनाश कुबल यांनी या संदर्भात सांगितले की, ग्रामीण भागात प्लॅस्टिकबंदी ही ९० टक्के फेल गेली आहे. शहरी भागामध्ये प्लॅस्टिकबंदीवर महापालिकेचे नियंत्रण आहे. शहरात प्लॅस्टिकचा हवा तसा वापर केला जात नाही. ग्रामीण भागात प्लॅस्टिकबंदी अंमलात आणली जात नाही. बरेचसे प्लॅस्टिक हे पाण्याच्या स्रोतामध्ये जात असल्याने ते घातक आहे. यावर नियंत्रण आणण्यासाठी सरकारने विचार करायला हवा, तरच प्लॅस्टिकबंदी यशस्वी ठरेल; अन्यथा नाही.
दादर चौपाटीचे स्वच्छता दूत मल्हार कळंबे यांनी सांगितले की, आतापर्यंत दादर चौपाटीवर ९० हून अधिक स्वच्छता मोहिम राबविण्यात आल्या आहेत. या मोहिमेदरम्यान प्लॅस्टिक कचरा मोठ्या प्रमाणात आढळून येतो. प्लॅस्टिकबंदी झाली असली, तरी बाजारामध्ये प्लॅस्टिकचा वापर सुरू आहे. सुरुवातीला महापालिकेकडून कारवाई केली जात होती. कालांतराने ही कारवाई बंद पडली आणि प्लॅस्टिकचा वापर पुन्हा सुरू झाला.
अजूनही मोठ्या प्रमाणात मुंबईच्या समुद्र किनाºयावर प्लॅस्टिक जमा होतोय. सरकारने प्लॅस्टिकबंदीची कारवाई पुन्हा सुरू करावी, तरच प्लॅस्टिकबंदी नागरिकांकडून अंमलात आणली जाईल.