प्लॅस्टिक पिशव्यांना तिलांजली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2018 02:28 AM2018-07-23T02:28:43+5:302018-07-23T02:29:04+5:30
‘लोकमत’ टीमने मुंबई शहर, पूर्व आणि पश्चिम उपनगरात घेतला आढावा
मुंबई : पर्यावरणासह भविष्यातील संकटांची चाहूल ओळखत, शासनाने प्लॅस्टिकबंदीचा घेतलेला निर्णय एक महिन्याभरापूर्वी प्रत्यक्ष लागू केला. प्लॅस्टिकबंदी लागू झाल्यापासून प्लॅस्टिकचा वापर करणाऱ्यांवर महापालिकेच्या प्लॅस्टिक निर्मूलन पथकाने कारवाई करण्यास सुरुवात केली. केवळ कारवाई नाही, तर पाच हजार रुपये दंडही ठोठावला. आज महिन्याभरानंतर खरेच प्लॅस्टिकबंदी लागू झाली आहे का, ग्राहक आणि दुकानदार खरेच प्लॅस्टिकपासून दूर गेले आहेत का? की, अजूनही खुलेआम प्लॅस्टिक पिशव्यांचा वापर सुरू आहे, याबाबतचे वास्तव टिपण्यासाठी ‘लोकमत’ टीमने मुंबई शहर, पूर्व आणि पश्चिम उपनगरात ‘रिअॅलिटी चेक’ केले. यात अनेकांनी प्लॅस्टिक पिशव्यांना तिलांजली दिल्याचे निदर्शनास आले. जमेची बाजू म्हणजे, मुंबईकरांनी पर्यावरणस्नेही अशा कापडी, कागदी पिशव्या वापरण्यावर भर दिला. याचेच फलित म्हणून प्लॅस्टिकबंदीचा श्रीगणेशा होत गेला.
क्रॉफर्ड मार्केट - प्लॅस्टिक हद्दपार : दक्षिण मुंबईतील मोठी बाजारपेठ मानल्या जाणाºया क्रॉफर्ड मार्केटमध्ये प्लॅस्टिकबंदीचे काटेकोर पालन होताना दिसले. या वेळी मार्केटमधील एका फळ विक्रेत्याकडे प्लॅस्टिक पिशवीची मागणी करण्यात आली. मात्र, विक्रेत्याने प्लॅस्टिकची पिशवी नसल्याचे सांगितले. अधिक फळे घेण्याचे आमिष दाखविल्यानंतरही पिशवी नसल्याचे सांगण्यात आले. प्लॅस्टिक पिशवीला पर्याय म्हणून या ठिकाणी कागदी पिशव्यांसह कापडी पिश्ांव्या ठेवण्यात आल्या होत्या. कागदी पिशवी मोफत, तर कापडी पिशवी १५ व २० रुपये दराने विकण्यात येत होत्या. फळ विक्रेत्यांव्यतिरिक्त सुका मेवा, गिफ्ट पॅकिंग, ग्लास, प्लेट्स अशा विविध वस्तू कागदी, कापडी आणि लाकडापासून तयार केल्याचे दिसले. किराणा पॅकिंगसाठी प्लॅस्टिक पिशव्यांना देण्यात आलेल्या परवानगीचाही विक्रेत्यांकडून पुरेपूर वापर होत असल्याचे चित्र मार्केटमध्ये दिसले.
कुर्ला, विद्याविहार, घाटकोपर - आम्ही प्लॅस्टिकची पिशवी वापरत नाही
कुर्ला पश्चिमेकडील बैलबाजार, कुर्ला रेल्वे स्थानकाच्या पश्चिमेकडील बाजार परिसर, विद्याविहार रेल्वे स्थानकाच्या पश्चिमेकडील परिसर, घाटकोपर पश्चिमेकडील बाजार परिसरातील फेरीवाल्यांसह दुकानदारांनी प्लॅस्टिकच्या पिशव्या देणे बंद केले आहे. नुसते देणे नाही, तर वापरणेच बंद केले. जेव्हा ग्राहक त्यांच्याकडे साहित्य घेतल्यानंतर प्लॅस्टिक पिशवीची मागणी करतात, तेव्हा आम्ही प्लॅस्टिकची पिशवी वापरत नाही; आणि देत नाही, असे उत्तर फेरीवाल्यांसह दुकानदारांकडून मिळते. विशेषत: तुम्हीही प्लॅस्टिकची पिशवी वापरू नका. प्लॅस्टिकची पिशवी मागू नका. कापडी अथवा कागदी पिशवी साहित्य घेण्यासाठी आणा, असा सल्लाही फेरीवाल्यांसह दुकानदारांकडून ग्राहकांना दिला जातो, असे ‘लोकमत’ने केलेल्या ‘रिअॅलिटी चेक’दरम्यान निदर्शनास आले.
पोलीस मुख्यालयासमोर प्लॅस्टिकबंदीला हरताळ
मुंबई पोलीस आयुक्त मुख्यालयासमोरच प्लॅस्टिकबंदीला हरताळ फासल्याचे दिसले. पर्यावरण विभागाने बंदी घातलेल्या डस्टबिन बॅग आयुक्त मुख्यालयासमोरील पोलीस चौकीसमोर सर्रासपणे विकल्या जात होत्या. ३० डस्टबिन बॅग पॅकिंग केलेल्या या पिशव्यांसाठी विक्रेते ग्राहकांकडून २० रुपये आकारत होते. या बॅगवर बंदी आहे का? असे विक्रेत्यांना विचारले. त्यावर विक्रेत्यांनी या बॅगवर बंदी नसल्याचे सांगितले. या ठिकाणी प्रत्येक नागरिकाला डस्टबिन बॅग घेण्याचा आग्रह विक्रेते करत होते. नागरिकांना डस्टबिन बॅगवर बंदी असल्याचे सांगताच, बंदी नसल्याचे विक्रेते सांगत होते. बहुतेक ग्राहक संभ्रमावस्थेत असल्याने बिनदिक्कतपणे डस्टबिन बॅगची खरेदी करत होते. त्यामुळे महापालिका मुख्यालयापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या मंगलदास मार्केटच्या प्रवेशद्वाराजवळ सुमारे १० ते १५ विक्रेते डस्टबिन बॅगची विक्री करताना दिसले.
मुलुंड, कांजूरमार्ग येथे प्लॅस्टिक पिशवी बंद
रेल्वे स्थानकांच्या परिसरात फळ विक्रेते स्वत:हून प्लॅस्टिक पिशवीचा वापर टाळताना दिसून येत आहेत. प्लॅस्टिक पिशवीऐवजी कागदाचा वापर करतात. नागरिक स्वत: कापडी किंवा कागदी पिशव्या वापरत आहे. किरकोळ किराणा दुकानात प्लॅस्टिक पिशव्या दिसून येत आहेत. सँडविच, वडापाव विक्रेत्यांकडे प्लॅस्टिकला पर्यायी वस्तूचा वापर केला जातो. काही मांस विक्रेत्यांकडे प्लॅस्टिक पिशव्या मिळत आहेत, तर काही मांस विक्रेत्यांकडे घरातूनच भांडी घेऊन मांस किंवा माशांची खरेदी केली जाते. कांजूरमार्ग येथील रहिवासी मयूर मांडवणकर यांनी सांगितले की, कांजूरमार्ग पूर्वेकडील नेहरूनगरमध्ये प्लॅस्टिकबंदीला सकारात्मक पाठिंबा आहे.
दादर : १०० टक्के प्लॅस्टिकबंदी
दादरमध्ये सर्व व्यापारी, भाजीविक्रेते यांनी नो प्लॅस्टिक धोरण अवलंबले आहे. महिन्याभरात पालिकेने केलेल्या दंडात्मक कारवाईमुळे येथील छोट्या-मोठ्या व्यापारी, दुकानदारांनी प्लॅस्टिक पिशवी आपल्या दुकानातून हद्दपार केल्याचे चित्र समोर आले आहे. दादर स्टेशन परिसरात असणाºया दुकानांमध्ये आता प्लॅस्टिक पिशव्यांचा वापर टाळून कापडी किंवा कागदी पिशव्या वापरल्या जाऊ लागल्या आहेत. ज्या ग्राहकांकडे पिशव्या नसतील, त्यांना कागदामधून साहित्य गुंडाळून दिले जात आहे. दादर स्टेशन परिसरात अनेक लहान-मोठी दुकाने आहेत. महिन्याभरात गणेशोत्सव असल्यामुळे सध्या दादरच्या बाजारपेठा गणेशोत्सवाच्या साहित्यांनी फुलून गेल्या आहेत. त्यामुळे नागरिकांची बरीच गर्दी होतेय. मात्र, या दुकानात प्लॅस्टिकचे कोणतेही साहित्य विक्रीसाठी ठेवण्यात आले नाही. प्लॅस्टिक कप, चमचे, वाट्या, ताट यांची जागा आता कागदी आणि लाकडी वाट्या, चमचे, कप यांनी घेतली आहे. दादर स्टेशनला लागून असलेल्या सावरकर भाजीमंडईतही प्लॅस्टिकबंदी कडकपणे पाळली जात आहे. भाजी विक्रेते भाज्या ग्राहकांना कापडी पिशवीत अथवा कागदात गुंडाळून देत असल्याचे चित्र दिसत आहे.