Join us

प्लास्टिक पिशव्या घेणार, कापडी पिशव्या देणार; बांद्रेकरवाडी मित्र मंडळाचा स्तुत्य उपक्रम

By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2018 11:21 PM

प्लास्टिकमुक्त परिसरासाठी बांद्रेकरवाडी मित्र मंडळाचं कौतुकास्पद पाऊल

- मनोहर कुंभेजकर

मुंबई: राज्य सरकारने गेल्या शनिवारपासून राज्यात प्लास्टिक बंदी सुरू केली आहे. ही बंदी यशस्वी व्हावी, यासाठी जोगेश्वरीतील बांद्रेकरवाडी मित्र मंडळानं पुढाकार घेत स्तुत्य उपक्रम राबवला आहे. या मंडळाकडून उद्या (रविवारी) प्लास्टिक पिशव्या गोळा केल्या जाणार असून त्याबदल्यात कापडी पिशव्यांचं वाटप केलं जाणार आहे. प्लास्टिक बंदी पूर्णत्वास नेण्यासाठी बांद्रेकरवाडी मित्र मंडळानं परिसरातील प्रत्येक घर प्लास्टिक मुक्त करण्याच्या उद्देशानं महत्त्वपूर्ण पाऊल उचललं आहे. उद्या मंडळाचे 25 ते 30 कार्यकर्ते सकाळी 9 ते दुपारी 2 दरम्यान रहिवाशांच्या घरी जाऊन त्यांच्या घरातील प्लास्टिक पिशव्या, प्लास्टिक बाटल्या, थर्माकॉल, प्लास्टिक प्लेट या वस्तू जमा करणार आहेत. त्या बदल्यात मंडळाकडून रहिवाशांना कापडी पिशव्यांचं वाटप केलं जाणार आहे. यासाठी मंडळानं 5 हजार कापडी पिशव्या तयार केल्या आहेत. रहिवाशांकडून जमा झालेलं प्लास्टिक मुंबई महानगरपालिकेच्या यंत्रणांकडे सुपूर्द करण्यात येणार आहे. प्लास्टिक मुक्त महाराष्ट्राची सुरुवात ही बांद्रेकरवाडीपासून करायची असल्याचं मंडळाचे सामाजिक कार्यकर्ते गणेश हिरवे यांनी सांगितलं. प्लास्टिकमुक्त बांद्रेकरवाडीसाठी सर्व रहिवाशांची साथ आवश्यक आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून बांद्रेकरवाडी राज्यासमोर एक वेगळा आदर्श निर्माण करेल, असा विश्वासदेखील त्यांनी व्यक्त केला.  

टॅग्स :प्लॅस्टिक बंदीमुंबई