मुंबई : राज्य सरकारच्या आदेशानुसार येत्या 23 जूनपासून प्लास्टिकचे उत्पादन आणि विक्री करणाऱ्या तसेच प्लास्टिकचा वापर करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्यांना पाच हजारपासून २५ हजार रुपयांपर्यंत दंड होणार आहे. तसेच, तीन वर्षे तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते.ही दंडात्मक कारवाई करण्यासाठी मुंबई महापालिका सज्ज झाली आहे. मुंबईत पूर्णपणे प्लास्टिकबंदी करण्यासाठी महापालिकेच्या प्रशासनाकडून उपाययोजना आखल्या जात आहेत. यासाठी मार्टेक, परवाना विभाग, दुकान आणि आस्थापना विभागाच्या निरीक्षकांची स्वतंत्र्य पथके तयार करण्यात येत आहे. याचबरोबर, मुंबई महापालिकेने प्लास्टिकच्या पर्यायाविषयी माहिती देण्यासाठी वरळी येथे 22 ते 24 जूनला एका प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. यामध्ये अभिनेता अजय देवगन आणि काजोल यांच्यासह अनेक सेलिब्रिटी असणार आहेत. दरम्यान, प्लास्टिकचा पर्यायी उपाय नसल्यामुळे व्यापारी आणि लोकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. प्लास्टिक पिशव्यांशिवाय थर्मोकोल, स्ट्रॉ यासह अनेक प्लास्टिकच्या उत्पादनांवर बंदी घातली आहे. दरम्यान, प्लास्टिक गोळा करण्यासाठी मुंबई महापालिकेतर्फे ठिकठिकाणी मोठे डबे ठेवण्यात आले असून अनेक ठिकाणी बॉटल क्रशिंग मशिन्स बसवण्यात आल्या आहेत. जे नागरिक 10 किलोपर्यंत प्लास्टिक किंवा थर्माकोल जमा करतील त्यांच्यासाठी 2 मे पासून महापालिकेतर्फे 1800222357 या क्रमांकावर हेल्पलाईन सुरू करण्यात आली असून ती सकाळी 9 ते रात्री 9 अशी सुरू आहे. ज्या हौसिंग सोसायटींकडे मोठ्या प्रमाणात प्लास्टिक कचरा आहे त्या हेल्पलाईनची मदत घेवू शकतात. राज्य सरकारने प्लास्टिकची विल्हेवाट लावण्यासाठी तीन महिन्यांची मुदत दिली होती. ही मुदत आता 23 जूनला संपणार आहे. प्लास्टिकचा वापर मोठ्या प्रमाणात असल्याने दंडात्मक कारवाईसाठी महापालिका, नगरपालिका आणि ग्रामपंचायतींना मोठी यंत्रणा राबवावी लागणार आहे.
Plastic Ban: मुंबईकरांनो सावधान! 23 जूनपासून प्लास्टिक वापराल तर होईल दंडात्मक कारवाई...
By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2018 12:15 PM
राज्य सरकारच्या आदेशानुसार येत्या 23 जूनपासून प्लास्टिकचे उत्पादन आणि विक्री करणाऱ्या तसेच प्लास्टिकचा वापर करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे.
ठळक मुद्दे23 जूनपासून प्लास्टिक वापराल तर होईल दंडात्मक कारवाईदंडात्मक कारवाईसाठी मुंबई महापालिका सज्जप्लास्टिकच्या पर्यायाविषयी माहिती देण्यासाठी आयोजन