प्लास्टीकवरील बंदी फसली; बाजारात सर्रास वापर, ११ महिन्यांत ६४ लाखांचा दंड वसूल
By ऑनलाइन लोकमत | Published: June 7, 2023 12:14 PM2023-06-07T12:14:05+5:302023-06-07T12:14:28+5:30
कोरोनामुळे मुंबईत थंडावलेली प्लास्टिक बंदी कारवाई १ जुलै २०२२ पासून पुन्हा सुरू करण्यात आली.
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : कोरोनामुळे मुंबईत थंडावलेली प्लास्टिक बंदी कारवाई १ जुलै २०२२ पासून पुन्हा सुरू करण्यात आली. मात्र, या कारवाईला अद्याप वेग आलेला नाही. ही कारवाई प्रभावी होत नसल्याने बाजारात, फेरीवाल्यांकडे सर्रास प्लास्टिकचा वापर होत असल्याने या मोहिमेचा पुरता बोजवारा उडाला आहे. मागील ११ महिन्यांत फक्त ४ हजार ६६४ किलो प्लास्टिक जप्त केले असून, ६४ लाख ८० हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे, तर ३२ प्रकरणात न्यायालयीन कारवाई सुरू असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.
२०१८ मध्ये ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्यांची विक्री, वापर करणारे व उत्पादन करणाऱ्यांवर कारवाई करण्याचा निर्णय मुंबई पालिकेने घेतला. या मोहिमेची प्रभावीपणे सुरुवात करण्यात आली. दुकाने, आस्थापने, उपाहारगृहे, बाजार, गोदामे, मॉल, कारखाने, आदी ठिकाणी बंदी असलेल्या प्लास्टिक पिशव्या वापरणाऱ्यांवर पालिकेकडून कारवाई केली जाते. मात्र, कोरोनाच्या संकटामुळे दोन वर्षे प्लास्टिक कारवाई थांबली होती. कोरोना नियंत्रणात आल्यानंतर १ जुलै २०२२ पासून थंडावलेली ही कारवाई पुन्हा सुरू करण्यात आली. मात्र, आतापर्यंत मागील ११ महिन्यांत ही कारवाई अत्यंत संथगतीने सुरू असल्याची स्थिती आहे.
कारवाई प्रभावीपणे होत नसल्याने फेरीवाले, बाजारात सर्रास प्लास्टिक पिशव्यांचा वापर केला जातो. आतापर्यंत १ जुलै २०२२ ते २ जून २०२३ पर्यंत ४ हजार ६६४ किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले, तर ६४ लाख ८० हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला, तर ३२ प्रकरणांत न्यायालयीन कारवाईही सुरू असल्याचे सांगण्यात आले.
- १ जुलै २०२२ पासून थंडावलेली ही कारवाई पुन्हा सुरू करण्यात आली.
- मात्र, आतापर्यंत मागील ११ महिन्यांत ही कारवाई अत्यंत संथगतीने सुरू असल्याची स्थिती आहे.
- सध्या वॉर्डनिहाय असलेले कर्मचारी, अधिकारी फेरीवाल्यांचे ओळखीचे झाल्याने कठोर कारवाई होत नाही. त्यामुळे कारवाई तीव्र करण्यासाठी सर्व २४ वॉर्डांतील संबंधित कर्मचारी, अधिकाऱ्यांच्या आठवड्यातून दोनवेळा बदल्या करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला होता.
- याची अंमलबजावणी प्रभावीपणे झालेली नाही. त्यामुळे प्लास्टिकचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे.