Plastic Ban : दुसरा दिवस छाप्यांचा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2018 06:29 AM2018-06-25T06:29:41+5:302018-06-25T06:30:05+5:30
प्लॅस्टिक बंदी; मुंबईत चार लाखांचा, तर ठाण्यात ६० हजारांचा दंड वसूल
मुंबई : प्लॅस्टिक बंदीच्या अंमलबजावणीसाठी दुसऱ्या दिवशी, रविवारी मुंबईत सुरू असलेल्या छापासत्रात चार लाखांहून अधिक दंड वसूल झाला, तर ५९१ किलो प्लॅस्टिक जमा करण्यात आले आहे. ठाणे, उल्हासनगरमधून ६५ हजारांचा दंड वसूल करण्यात आला आणि १०० किलो प्लॅस्टिक जप्त करण्यात आले.
राज्यात शनिवारी मोठ्या प्रमाणावर कारवाई झाली, पण मुंबईत जनजाृतीवर भर देत संध्याकाळी कारवाई करण्यात आली होती. मुंबई-ठाण्यात रविवारी दिवसभर ठिकठिकाणी छापे टाकण्यात आले, तर नवी मुंबईत जनजागृती करण्यात आली.
मुंबई महापालिकेच्या प्लॅस्टिक निर्मूलन कायदा पथकाने रविवारी मुंबईत चेंबूर, घाटकोपर भागात ८८२ दुकानांवर छापे टाकले. यात मॉलमधील गाळे, शॉपिंग सेंटर यांचा समावेश होता. त्यातील ७२ दुकानांमध्ये ५९१.६७ किलो प्लॅस्टिक सापडल्याने त्यांच्याकडून तीन लाख ३५ हजारांचा दंड वसूल केला. पाच दुकानदारांनी दंड भरण्यास नकार दिल्याने त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. पावसाचा जोर कायम असला, तरी कारवाईत खंड पडला नाही.
कोणाचीही गय नको!
मुंबई महापालिकेच्या परवाना विभाग, बाजार विभाग आणि दुकाने व आस्थापना विभाग या तीन विभागांकडून ही संयुक्त कारवाई करण्यात येत आहे. बंदीचा आदेश जारी झाल्यानंतर प्लॅस्टिक निर्मूलन पथकातील २६९ निरीक्षकांना महापालिकेकडून कारवाईचे रीतसर प्रशिक्षण देण्यात आले. या कारवाईत मोठ्या आस्थापनांची गय करू नका, असे स्पष्ट आदेश महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी या पथकाला दिले आहेत.
मुंबई महापालिकेच्या प्लॅस्टिक निर्मूलन कायदा पथकाने आपले काम सुरू केले आहे. शनिवारी आणि रविवारी पालिका कारवाई करणार नाही, अशा भ्रमात काही दुकानदार होते. मात्र, रविवारीही पथकाने आपले काम सुरू ठेवले आहे. सोमवारपासून हे कारवाईसत्र वेग घेईल. मुंबईतील मॉल, दुकाने यातील संपूर्ण प्लॅस्टिक नष्ट करण्याचा आमच्या पथकाचा प्रयत्न राहील.
- निधी चौधरी, माहिती उपायुक्त (विशेष), मुंबई महापालिका.
ठाणे जिल्ह्यात प्लास्टिक बंदीवरील कारवाईला रविवारी थंड प्रतिसाद मिळाला. ठाणे महापालिकेने रविवारी कळवा आणि मुंब्रा परिसरातील व्यापाºयांकडून ६० हजाराचा दंड वसूल केला.
शहरातील गृहनिर्माण सोसायट्यांमधून जवळपास १०० किलोपेक्षा जास्त प्लास्टिक जप्त केले. उल्हासनगरात पाच हजारांची दंड वसूल झाला. कल्याण डोंबिवलीत कारवाई करण्यात आली नसली, तरी एका स्वयंसेवी संघटनेने प्लास्टिक कचरा गोळा करण्याचा उपक्रम राबवला.