Plastic ban : लाभदायक प्लास्टिक; मुंबई पालिकेच्या तिजोरीत किती जमा झाले बघा!
By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2018 12:10 PM2018-06-27T12:10:02+5:302018-06-27T12:13:21+5:30
राज्यात गेल्या 23 जूनपासून प्लास्टिक बंदी लागू करण्यात आली आहे. मुंबई महापालिकेच्या प्लॅस्टिक निर्मूलन कायदा पथकाने मंगळवारी 255.400 किलो प्लास्टिक जप्त केले असून तीन लाख 90 हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे.
मुंबई : राज्यात गेल्या 23 जूनपासून प्लास्टिक बंदी लागू करण्यात आली आहे. मुंबई महापालिकेच्या प्लॅस्टिक निर्मूलन कायदा पथकाने मंगळवारी 255.400 किलो प्लास्टिक जप्त केले असून तीन लाख 90 हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे.
मुंबई महापालिकेच्या प्लॅस्टिक निर्मूलन कायदा पथकाने आतापर्यंत 5,440 दुकानांवर छापे टाकले. यातील 94 दुकानांध्ये बंदी घालण्यात आलेले प्लास्टिक सापडले. प्लास्टिक सापडलेल्या 78 दुकानदारांनी दंड भरला, तर 16 जणांनी दंड भरण्यास नकार दिला आहे. त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.
राज्य सरकारच्या आदेशानुसार 23 जूनपासून प्लास्टिकचे उत्पादन आणि विक्री करणाऱ्या तसेच प्लास्टिकचा वापर करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जात आहे. प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्यांना पाच हजारपासून 25 हजार रुपयांपर्यंत दंड लावण्यात येणार आहे. तसेच, तीन वर्षे तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते. दरम्यान, प्लास्टिक गोळा करण्यासाठी मुंबई महापालिकेतर्फे ठिकठिकाणी मोठे डबे ठेवण्यात आले असून अनेक ठिकाणी बॉटल क्रशिंग मशिन्स बसवण्यात आल्या आहेत.
कोणाचीही गय नको!
मुंबई महापालिकेच्या परवाना विभाग, बाजार विभाग आणि दुकाने व आस्थापना विभाग या तीन विभागांकडून ही संयुक्त कारवाई करण्यात येत आहे. बंदीचा आदेश जारी झाल्यानंतर प्लॅस्टिक निर्मूलन पथकातील 269 निरीक्षकांना महापालिकेकडून कारवाईचे रीतसर प्रशिक्षण देण्यात आले. या कारवाईत मोठ्या आस्थापनांची गय करू नका, असे स्पष्ट आदेश महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी या पथकाला दिले आहेत.