छोट्या दुकानदारांना दिलासा; पॅकेजिंगसाठी प्लास्टिक वापरण्याची परवानगी
By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2018 10:24 PM2018-06-27T22:24:37+5:302018-06-27T22:29:31+5:30
अवघ्या चार दिवसात प्लास्टिकबंदीच्या निर्णयात बदल करण्याचा निर्णय
मुंबई : पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी केवळ चार दिवसात प्लास्टिकबंदीच्या निर्णयात बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. निर्णयातील या बदलामुळे किराणा दुकानावरच्या पॅकेजिंगवरची बंदी उद्यापासून उठवली जाणार आहे. त्यामुळे ब्रँडेड आणि मोठ्या पॅकेजिंग उत्पादकांप्रमाणे आता किरकोळ दुकानदारांनाही दिलासा मिळाला आहे.
साखर, मसाला, तांदूळ, तेल यासारख्या वस्तूंच्या विक्रीसाठी रिटेल पॅकेजिंगवरची बंदी उठवण्याची घोषणा पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी केली. 'ग्राहकांना प्लास्टिक पिशवी वापरण्यासाठी बंदी आहे. मात्र किराणा दुकानातील पॅकेजिंग वस्तूंसाठी प्लास्टिक वापरता येईल,' अशी माहिती रामदास कदम यांनी दिली. काही अटींसह ही बंदी उठवण्यात येत असल्याचं त्यांनी सांगितलं.