महालक्ष्मी मंदिरामध्ये ‘प्लॅस्टिकबंदी’; नवरात्रौत्सवासाठी सज्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2019 01:03 AM2019-09-26T01:03:07+5:302019-09-26T01:03:23+5:30
कापडी पिशव्यांचा वापर करण्याचे आवाहन
मुंबई : मुंबईकरांचे आराध्य दैवत असलेल्या महालक्ष्मी मंदिरामध्ये नवरात्रौत्सवाची तयारी जोरात सुरू असून, नवरात्रीच्या दर दिवशी साधारणत: लाखो भाविक दर्शनासाठी येतात. यंदाही नवरात्रौत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात असून, भाविकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने सर्व प्रकारची तयारी मंदिर व्यवस्थापनाने व पोलीस प्रशासनाने केलेली आहे, असे महालक्ष्मी मंदिराचे मुख्य व्यवस्थापक शरदचंद्र पाध्ये यांनी सांगितले.
नवरात्रौत्सवामध्ये मंदिर सकाळी पाच वाजल्यापासून सुरू होईल व रात्री दहा वाजता बंद करण्यात येईल. देवळाच्या आवारात व हाजीअलीपर्यंतच्या परिसरात ६२ सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले असून, मंदिरामध्ये पोलीस उपायुक्त राजीव जैन व सहायक पोलीस आयुक्त नागेश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांचा ताफा असेल. भाविकांच्या व्यवस्थापनासाठी गेली २८ वर्षे वैष्णव चॅरिटेबल ट्रस्ट कार्यरत असून, अनिरुद्ध अकादमी, नागरीसेवा दल आणि होमगार्डसुद्धा मदत करते. देवळामध्ये एक रुग्णवाहिका व सकाळ-सायंकाळ १४ डॉक्टरांची टीम तैनात करण्यात येईल, असे पाध्ये यांनी सांगितले.
मंदिराचे व्यवस्थापक भालचंद्र वालावलकर यांनी मंदिरामध्ये येताना भाविकांनी पूजेचे साहित्य प्लॅस्टिकची थाळी किंवा प्लॅस्टिक पिशवीतून न आणता कापडी पिशवीचा, छोट्या टोपल्यांचा वापर करावा, असे कळविले आहे. महालक्ष्मी मंदिराच्या वतीने शैक्षणिक मदत तीन कोटी रुपये, रुग्णसेवेसाठी साडेआठ कोटी रुपये व निरनिराळ्या संस्थांना चार कोटी रुपये मदत देण्यात येते. त्याचप्रमाणे, सोमवार ते शुक्रवार विनामूल्य दवाखाना असून, रुग्णांना औषधेही वितरित केली जातात. यंदा उत्सवादरम्यान वाहतूक व्यवस्थापन सांभाळण्यासाठी ३० पोलिसांचा ताफा असणार आहे.