Join us

प्लास्टीकचा महापूर कायम

By सचिन लुंगसे | Published: June 05, 2023 12:56 PM

अनेक छोट्या-मोठ्या घटकांत वापरले जाणारे प्लास्टिक मुंबापुरीसमोर भस्मासूर म्हणून उभे राहिले आहे. 

सचिन लुंगसे, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरातून वाहणारी मिठी नदी, छोटे नाले, मोठे नाले, गटारे अशा सांडपाण्याच्या वाहिन्या केवळ आणि केवळ प्लास्टिकच्या कचऱ्यामुळे चोकअप होत असून, या वाढत्या प्लास्टीक प्रदूषणामुळे वायू प्रदूषणाचा प्रश्नदेखील जटिल झाला आहे. दैनंदिन वापरातल्या प्लास्टिकच्या वस्तू शिवाय इतर अनेक छोट्या-मोठ्या घटकांत वापरले जाणारे प्लास्टिक मुंबापुरीसमोर भस्मासूर म्हणून उभे राहिले आहे. 

जलप्रदूषण रोखून अधिकाधिक पर्यावरणपूरक उपाययोजना करण्यासाठी प्रशासन प्रयत्न करीत आहे. समुद्र किनारा स्वच्छ राखणे,  खारफुटीचे क्षेत्र प्लास्टीक मुक्त राखणे, प्लास्टिक आणि इतर तत्सम कचरा समुद्रामध्ये थेट वाहून न जाता त्यापूर्वीच तो संकलित करणे यासाठी पालिका प्रशासनाकडून वेगवेगळ्या उपाययोजनांची चाचपणी करण्यात येत आहे.

या कचऱ्याचे करायचे काय?

-  मुंबईत वर्षाला तीन ते चार लाख टन एवढा ई कचरा जमा होतो. तर दिवसाला एक हजार टन ई कचरा जमा होतो.

-  इलेक्ट्रॉनिक वस्तू अयोग्य पद्धतीने फेकून दिल्यास त्यातून विषारी रसायने बाहेर पडतात. त्याचा विपरीत परिणाम पृथ्वीवरील माती, हवा, जल आणि पयार्याने मानवी आरोग्यावर होतो.

-  ई कचऱ्यात मोबाइल फोन, चार्जर, लॅपटॉप, की-बोर्ड, माऊस, टीव्ही, डेस्कटॉप, मिक्सर, ओव्हन, इस्त्री, फ्रीज, वॉशिंग मशीनचा समावेश आहे.

जुहूतील गझधरबंध नाला तसेच मेन अव्हेन्यू नाला, अंधेरीतील मोगरा नाला, ओशिवरा नदी, पोइसर नदी, दहिसर नदी, वाकोला नदी तर पूर्व उपनगरातील मिठी नदी (वांद्रे- कुर्ला संकूल जोडपूल) येथे पाण्यासोबत प्लास्टिक कचरा मोठ्या प्रमाणावर वाहून येतो. प्लास्टीक प्रदूषणामुळे वायु प्रदूषणाचा प्रश्नदेखील जटिल आहे. महापालिका प्रशासन अद्याप अपयशी.

महापालिका काय म्हणते?

महानगरपालिकेकडून प्रदूषण रोखण्यासाठी प्रयत्न आणि उपाययोजना तर करण्यात येत आहेतच. मात्र, या प्रयत्नांना जनतेची साथ मिळणेदेखील महत्त्वाचे आहे. यामुळे मुंबईचा समुद्रकिनारा, तसेच महानगरातील नदी-नाले स्वच्छ राखण्यासाठी, एकूणच जलप्रदूषण रोखण्यासाठी नागरिकांनी प्लास्टिक तसेच तत्सम कोणत्याही प्रकारचा कचरा नदी- नाल्यांमध्ये टाकू नये.

आपल्या दैनंदिन वापराच्या साहित्यामध्ये प्लास्टिकचे प्रमाण ८० टक्के आहे. मुंबईच्या प्रदूषणामध्ये प्लास्टिकचा वाटा ४० टक्के आहे. इकडे वाटा हा शब्द वाईट अर्थाने आहे. महापालिका जेव्हा कचऱ्यातले प्लास्टिक गोळा करते आणि ते जेव्हा डम्पिंग ग्राउंडवर जाते; तिथे त्याची विल्हेवाट लागत नाही. उलटपक्षी अनेक वेळा प्लास्टिक जाळले जाते. त्यामुळे हवा प्रदूषित होते.  - डी. स्टॅलिन, प्रमुख, वनशक्ती.

मुंबई शहर आणि उपनगरात सध्या जे काही प्रदूषण नोंदविले जाते त्या प्रदूषणामध्ये प्लास्टीकचे प्रमाण अधिक असते. हे प्रमाण कमी करण्यासाठी सरकारी संस्था किंवा प्रशासनाने प्रत्येक वेळी काम करणे गरजेचे आहे, असे नाही. सर्वसामान्याने दैनंदिन आयुष्यात प्लास्टिकच्या वस्तूंचा वापर कमी केला तर साहजिकच प्लास्टिकचा वाढता भस्मासूर कमी करण्यास आपणाला निश्चित मदत होईल.- भगवान केशभट, संस्थापक, वातावरण फाउंडेशन.

नदी किंवा नाल्यात प्लास्टिक अडकणे आणि त्यामुळे मुंबईत पूर येणे याचा आपण एकमेकांशी संबंध लावता कामा नये. कारण नदी आणि नाल्यामध्ये प्लास्टिक अडकू नये, यासाठी प्रशासनाने संबंधित ठिकाणी जाळी बसविण्याचे काम केले पाहिजे. हा प्रयोग जर केला तर गोळा झालेले प्लास्टिक बाजूला काढणे सोपे जाईल. आणि नदी नालेदेखील तुंबणार नाहीत. शिवाय मुंबईत पूरदेखील येणार नाही. - झोरू बाथेना, पर्यावरण अभ्यासक.

मुंबईच्या डम्पिंग ग्राउंडवर जो कचरा येतो; त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर प्लास्टिक असते. अनेक वेळा हा कचरा जाळला जातो. त्यात प्लास्टिकदेखील जाळले जाते. त्यातून निघणाऱ्या विषारी वायूंचा लगत राहणाऱ्या रहिवाशांना मोठ्या प्रमाणावर त्रास होतो. महापालिका राज्य सरकार यांनी अशा प्रदूषणामुळे लोकांना त्रास होणार नाही, अशा उपाययोजना केल्या पाहिजेत. - शेख फय्याज आलम, गोवंडी न्यू संगम वेल्फेअर सोसायटी. 

टॅग्स :प्लॅस्टिक बंदी