एसटी चालकाच्या कॅबिनला बसविली प्लास्टिक शिल्ड
By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2020 07:14 PM2020-05-20T19:14:58+5:302020-05-20T19:15:32+5:30
कोरोना संसर्ग टाळण्यासाठी खबरदारी
मुंबई : लॉकडाऊन काळात एसटी महामंडळाच्यावतीने अत्यावश्यक सेवा दिली जात आहे. कोरोनाच्या संसर्गाचा धोका पत्करून एसटी बसचे चालक-वाहक अत्यावश्यक सेवा देत आहेत. त्यामुळे या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी, कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी एसटी महामंडळाने बेस्टसारखी संकल्पना तयार केली आहे. एसटी महामंडळाच्या एसटी बस चालकाच्या कॅबिनला आयसोलेशनमध्ये रूपांतर करण्याची सुरुवात केली आहे. चालकाच्या कॅबिनचा दरवाजा पारदर्शक प्लास्टिक शिल्ड लावून बंदिस्त करण्याची सुरुवात केली आहे.
अत्यावश्यक सेवा देण्यासाठी मुंबई शहर आणि उपनगरात दररोज बेस्टच्या फेऱ्या धावत आहेत. मात्र कोरोनाच्या संक्रमणामुळे बेस्ट कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा झाली. बुधवारपर्यंत कोरोनामुळे बेस्टच्या आठ कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला. तर, शंभरपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे बेस्ट कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी बेस्ट प्रशासनाकडून नुकताच एक संकल्पना तयार केली आहे. चालकाच्या मागच्या सीटवर पारदर्शक सुरक्षा कवच व्यवस्था करण्यात आली आहे. ज्यामुळे प्रवासी आणि बेस्टचा चालकाचा संपर्क होणार नाही. बेस्ट प्रशासनानंतर आता एसटी महामंडळ देखील अशी संकल्पना एसटी बसला केली आहे.
एसटी महामंडळाच्या यंत्र आणि अभियांत्रिकी विभागातील अधिकारी यांनी अत्यंत कमी बजेटमध्ये मुंबई, ठाणे आणि पालघर या विभागातील एसटी बसमध्ये ही व्यवस्था करण्यात आली असून एसटी कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेत वाढ झालेले आहे.
----------------------------
कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर मुंबईत अत्यावश्यक सेवा बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांना सुखरूपपणे ने-आण करण्यासाठी एसटीच्या मुंबई विभागामार्फत २३ मार्चपासून बस सेवा सुरु आहे.
सुमारे ३५० बसद्वारे दररोज सुमारे ७०० फेरी करुन १० ते १२ हजार अत्यावश्यक सेवा बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांची ने-आण करण्यात येत आहे.
त्यासाठी दररोज ४०० एसटीचे चालक, वाहक, यांत्रिकी, पर्यवेक्षक व अधिकारी आपला जीव धोक्यात घालून अहोरात्र काम करीत आहेत.
या ३५० एसटी बसच्या चालक कॅबिनला पारदर्शक प्लास्टिक शिल्ड लावण्यात येत आहे.
पुढील दिवसात मुंबई, ठाणे आणि पालघर विभागातील संपूर्ण बसला प्लास्टिक शिल्ड लावण्यात येणार आहे, अशी माहिती एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी दिली.