मुंबई : ‘प्लास्टिक सर्जरी’ ही विज्ञानाची देणगी आहे. एखाद्या व्यंगाने पछाडलेल्या व्यक्तीला किंवा अपघातामुळे शरीरात उणीव निर्माण झालेल्या व्यक्तीला आत्मविश्वास देण्याचे काम प्लास्टिक सर्जरी करते. शरीरातीलच काही भागांचा वापर करून नैसर्गिक त्वचा प्रत्यारोपण करता येते. ही सर्जरी आव्हानात्मक आहे. तरीही जगाच्या पटलावर भारताचे या प्रक्रियेत नाव आदराने घेतले जात असल्याचे मत प्लास्टिक सर्जन डॉ. रवीन थत्ते यांनी व्यक्त केले.यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मराठी विज्ञान परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या विज्ञानगंगा कार्यक्रमात डॉ. थत्ते बोलत होते. विज्ञानगंगा कार्यक्रमाच्या चौदावे पुष्पात डॉ. रवीन थत्ते यांचे प्लास्टिक सर्जरी विषयावर माहितीरूपी व्याख्यान ठेवण्यात आले होते. प्लास्टिक सर्जरी क्रियाशीलता वाढवते, त्यासोबत रूपही देते. यातून गमावलेला आत्मविश्वास परतू लागतो. म्हटली तर अवघड, म्हटली तर सोपी प्रक्रिया आहे. ‘प्लास्टिक सर्जरी’ असे म्हणण्यात आले असले, तरी शरीरातील अतिरिक्त भागाचा शिताफीने वापर करत, ग्रस्त भागाला पुन्हा तसेच रूप देणे म्हणजे प्लास्टिक सर्जरी होय. भाजलेल्या प्रकरणातील प्लास्टिक सर्जरी करताना आव्हान निर्माण होते. कारण जळलेली त्वचा आणि त्या खालील भाग सडू लागतो. शरीरातील पाठ हा सर्वात मोठा भाग असा आहे की, ज्यावरील त्वचा आपण वापरू शकतो. मात्र, सर्जरी करताना लहानसहान नसा कापल्या तरी चालतात. मात्र, मोठ्या नसा वाचवण्यात येतात.हेटरोग्राफ्ड, होमोग्राफ्ड, आयसोलोगोसग्राफ्ड, मॅटर्नलहोमोग्राफ्ड आणि आॅटोग्राफ्ड पद्धतीने त्वचा घेत प्लास्टिक सर्जरी करण्यात येते. आज भारतातील प्लास्टिक सर्जरीचे ज्ञान अत्याधुनिक आहे. त्यामुळेच येथील सर्जरींचा घटनांची माहिती बाहेरील देशही वापरत असल्याचे डॉ. थत्ते यांनी सांगितले. सध्या इराणहून आलेल्या इमान अहमदवर प्लास्टिक सर्जरी करून वजन घटविणे शक्य आहे का? यावर मात्र, डॉ. थत्ते यांनी नकारात्मक उत्तर दिले. एखाद्या अवयवांमध्ये वाढलेली चरबी लायकोसंक्शनने काढता येऊ शकते. इमानचे वजनाचे कारण आनुवंशिक असल्याचे त्यांनी या वेळी स्पष्ट केले. प्लास्टिक सर्जरीवर लिहिण्यात येणारा डॉ. थत्ते यांचा ब्लॉग जगभरात वाचला जातो. (प्रतिनिधी)
प्लास्टिक सर्जरीने रुग्णांमध्ये आत्मविश्वास येतो - रवीन थत्ते
By admin | Published: April 17, 2017 3:53 AM