मुंबई : प्लॅस्टिकबंदीच्या मोहिमेला फेरीवाल्यांनी हरताळ फासला आहे. त्यामुळे ग्राहकांना सर्रास प्लॅस्टिकची पिशवी देणाऱ्या फेरीवाल्यांना चाप लावण्यासाठी महापालिका कठोर पावले उचलणार आहे. त्यानुसार, फेरीवाल्यांकडे प्लॅस्टिक पिशवी आढळल्यास त्यांना काळ्या यादीत टाकून परवाना प्रक्रियेतून बाद करण्यात येणार आहे.राज्य सरकारने २३ जानेवारीपासून राज्यात प्लॅस्टिकबंदी लागू केली आहे. त्यानुसार, मुंबई महापालिकेनेही विशेष पथक स्थापन करून कारवाई सुरू केली. या पथकाने सुरुवातीच्या काही महिन्यांत मुंबईत दुकानगारांमध्ये कारवाईचा चांगलाच धाक निर्माण केला. मात्र, गेल्या दोन महिन्यांत ही कारवाई पूर्णपणे थंडावली असून, मंडई, दुकानांमध्ये सर्रास प्लॅस्टिक पिशव्यांचा वापर सुरू केला आहे.फेरीवाल्यांकडून ग्राहकांना प्लॅस्टिक पिशव्या दिल्या जात असल्याचे निदर्शनास आले आहे. यामुळे दुकानदार, मंडर्इंमधील गाळेधारकांमध्ये पुन्हा धाक निर्माण करून, प्लॅस्टिकचा वापर रोखण्यासाठी कारवाई तीव्र करण्याचा निर्णय घेतला. फेरीवाल्यांना लवकरच स्टॉलचे वाटप करण्यात येणार असल्याने, प्लॅस्टिकचा वापर केल्यास निवड प्रक्रियेतूनच बाहेर करण्याची तंबी पालिका प्रशासनाने दिली आहे.दोन कोटी दंड वसूल२३ जूनपासून आतापर्यंत ४७ हजार १६३ किलो प्लॅस्टिक महापालिकेच्या पथकाने जप्त केले आहे. या कारवाईत दोन कोटींहून अधिक रक्कम दंड स्वरूपात वसूल करण्यात आली आहे.अशी होणार कारवाईकारवाई करताना फेरीवाल्यांकडे प्लॅस्टिक पिशवी आढळल्यास, त्यांना काळ्या यादीत टाकून पालिकेच्या परवाना प्रक्रियेतून बाद करण्यात येणार असल्याचे, उपायुक्त विजय बालमवार यांनी सांगितले.
प्लॅस्टिक वापरणारे फेरीवाले परवाना प्रक्रियेतून बाद होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 05, 2019 1:15 AM