काँक्रीटच्या पाण्याच्या टाकीत प्लास्टिकची टाकी; भोंगळ कारभाराचा कळस
By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2020 09:51 PM2020-12-28T21:51:15+5:302020-12-28T21:52:03+5:30
परंतु उद्यान विकसित करण्यासाठी पाण्याची आवश्यकता असल्याने उद्यान विभागाचे अधिकारी हंसराज मेश्राम व कमर्चारी वर्ग पाहणी करण्यासाठी गेले तेव्हा सिमेंट काँक्रीटच्या बांधलेल्या टाकीत एक भली मोठी प्लास्टिक ची टाकी आढळून आली
मीरारोड - मीरा भाईंदर महापालिकेच्या अनागोंदी व निकृष्ठ कामांचे प्रकार नवीन नाहीत . परंतु मीरारोडच्या शांतीगार्डन मधील उद्यानात सिमेंट काँक्रीटची पाण्याची टाकी बांधताना आत मध्ये मोठी प्लास्टिकची पाण्याची टाकी तशीच ठेवण्याचा प्रकार करून पालिकेच्या बांधकाम विभागाने भोंगळपणाचा कळस गाठला आहे. मीरारोडच्या राम नगर जवळ शांती गार्डन वसाहतीत शांतीधाम जवळ पालिकेचे उद्यान आहे . सदर उद्यानात काही महिन्यां पूर्वीच पालिकेच्या बांधकाम विभागा मार्फत ठेकेदाराला कडून पाण्यासाठी भूमिगत सिमेंट काँक्रीटची टाकी बांधून घेण्यात आली . टाकीचे बांधकाम पूर्ण होऊन ठेकेदारास त्याचे पैसे अदा करण्याची कार्यवाही सुरु केली.
परंतु उद्यान विकसित करण्यासाठी पाण्याची आवश्यकता असल्याने उद्यान विभागाचे अधिकारी हंसराज मेश्राम व कमर्चारी वर्ग पाहणी करण्यासाठी गेले तेव्हा सिमेंट काँक्रीटच्या बांधलेल्या टाकीत एक भली मोठी प्लास्टिक ची टाकी आढळून आली. सिमेंटच्या टाकीचे चेंबर लहान व आतील टाकी मोठी अवाढव्य असल्याने ती बाहेर सुद्धा काढणे अशक्य ठरले . सदर प्रकार बाबत त्यांनी वरिष्ठाना कळवले. ठेकेदारा कडून सदर काँक्रीट टाकीच्या कामा दरम्यान भलीमोठी प्लास्टिकची टाकी आतच राहून गेली . विशेष म्हणजे पालिकेच्या बांधकाम विभागातील कनिष्ठ अभियंता, उपअभियंता आदींनी देखील सदर प्रकार दुर्लक्षित केला . या प्रकरणी कनिष्ठ अभियंता प्रफुल्ल वानखेडे यांच्याशी संपर्क केला असता त्यांच्या कडून प्रतिसाद मिळाला नाही.
दरम्यान, पालिकेच्या ठेकेदार व अभियंत्यांच्या हा भोंगळ कारभाराचा कळसच आहे . इतका मूर्खपणा करणारे अभियंता कसे असू शकतात ? या प्रकरणी ठेकेदार व संबंधित अधिकारी यांच्यावर कठोर कारवाई करा अशी मागणी मनसेच्या महिला शहर अध्यक्ष सोनिया फर्नाडिस यांनी केली आहे .