मुंबईची तुंबई होण्यास प्लॅस्टिकच जबाबदार!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2019 01:22 AM2019-09-27T01:22:46+5:302019-09-27T06:53:48+5:30

८१ टक्के मुंबईकरांचे मत; बंदीला हरताळ फासत ५९ टक्के नागरिकांकडून होतो प्लॅस्टिकचा वापर, सर्वेक्षणातील निष्कर्ष

Plastically responsible for Mumbai's Tumbi! | मुंबईची तुंबई होण्यास प्लॅस्टिकच जबाबदार!

मुंबईची तुंबई होण्यास प्लॅस्टिकच जबाबदार!

googlenewsNext

- सीमा महांगडे 

मुंबई : दरवर्षी पावसात होणाऱ्या मुंबईच्या तुंबईचे मुख्य कारण म्हणजे प्लॅस्टिकचा वाढलेला वापर आणि त्याने पाण्याचा निचरा होण्यास येणारे अडथळे हे असल्याचे तब्ब्ल ८१ टक्के मुंबईकर मान्य करतात. मात्र प्लॅस्टिकबंदी असूनही अद्याप ५९ टक्के मुंबईकर कधीतरी आणि २२ टक्के मुंबईकर नेहमी असे तब्बल ८१ टक्के मुंबईकर प्लॅस्टिकचा वापर करीत असल्याचे एका सर्वेक्षणातून समोर आले आहे.
प्लॅस्टिकबंदीसाठी घेण्यात येणाºया उपक्रमांतही तरुण आणि युवावर्गाचा सहभाग कमीच दिसून आला असून केवळ ५० टक्के विद्यार्थी अशा उपक्रमांत सहभागी होत असल्याचे समोर आले आहे.

प्लॅस्टिक मुंबई शहरासाठी मोठी समस्या बनत चालली आहे. याच पार्श्वभूमीवर प्लॅस्टिकबंदी मोहिमेतील नेमके अडथळे काय? प्लॅस्टिकबंदी संदर्भातील धोरणाचे कोणाकडून उल्लंघन होत आहे? याची माहिती करून घेण्यासाठी सेंट झेविअर्सच्या एफवायबीएच्या ११ विद्यार्थिनींनी ‘प्लॅस्टिक धोरण आणि त्याची कार्यक्षमता’ या विषयावर नुकताच एक सर्वेक्षण अहवाल सादर केला. यामध्ये १७ ते ६५ वयोगटांतील तब्बल १५०० मुंबईकरांचे सर्वेक्षण करण्यात आले असून यामध्ये विद्यार्थी, स्थानिक रहिवासी, दुकानदार, फेरीवाले आणि विक्रेते, उद्योजक यांचा समावेश करण्यात आला.

प्लॅस्टिकबंदी असूनही अद्याप ८१ टक्के प्लॅस्टिक वापरणारे मुंबईकर प्लॅस्टिक बॅगच्या रूपात ३४%, प्लॅस्टिक बॉटल्सच्या रूपात २६%, विविध वस्तूंच्या पॅकिंगच्या रूपात २७% प्लॅस्टिकचा वापर करतात. जे मुंबईकर प्लॅस्टिकचा वापर टाळतात त्यामध्ये ५२% लोक स्वत:ची बॅग सोबत घेऊन जात असल्याचे सांगतात. मुंबईत आजही ५३ मुंबईकरांनी सर्वाधिक प्लॅस्टिक हे फेरीवाले / विक्रेते, त्यानंतर ४३ % स्थानिक दुकानदारांकडून मिळत असल्याची माहिती दिली. प्लॅस्टिकबंदीसंदर्भातील काही प्रश्न उपाहारगृहांना विचारले असता ७३ टक्के उपाहारगृहांनी आपण प्लॅस्टिकबंदीचे नियम पाळत असल्याचे सांगितले. मात्र ४२ टक्के लोकांनी प्लॅस्टिक बंदीचा फटका बसल्याचीही माहिती दिली. फेरीवाले / विक्रेते यांना विचारण्यात आलेल्या प्रश्नांतून ९०% हून अधिक फेरीवाले / विक्रेते आजही प्लॅस्टिक बॅगचा वापर करीत असल्याचे उत्तर मिळाले. त्यांना हे प्लॅस्टिक किरकोळ विक्रेत्यांकडून मिळत असल्याची माहितीही त्यांनी दिली.

जे फेरीवाले / विक्रेते प्लॅस्टिकला पर्याय देतात त्यामध्ये ६०% कागदाचा पर्याय देतात तर काही कापडी पिशवीचा पर्याय पुढे करतात, मात्र त्यांची संख्या खूपच कमी आहे. शाळांसंदर्भात बोलायचे तर ४३% हून अधिक विद्यार्थी आजही प्लॅस्टिक बॉटल्स आणि डबे घेऊन जात आहेत; तर ५०% हून अधिक विद्यार्थी आजही पुस्तकांच्या कव्हर्ससाठी प्लॅस्टिकचा वापर करतात. शाळांच्या शैक्षणिक साहित्यातही ५०% हून अधिक प्लॅस्टिकचे साहित्य असल्याचे सर्वेक्षणातून समोर आले आहे. महाविद्यालयांच्या बाबतीत ७३ टक्के विद्यार्थ्यांना प्लॅस्टिक धोरणांबाबत माहिती असूनही ६५ टक्क्यांहून अधिक विद्यार्थी प्लॅस्टिकबंदीसाठीच्या पुढाकारात सहभागी होत नसल्याचे समोर आले आहे.

जागरूकतेसह अंमलबजावणी गरजेची
अविघटनशील प्लॅस्टिकच्या वापराचे हळूहळू होणारे कायमस्वरूपी दुष्परिणाम आणि प्लॅस्टिकबंदी धोरणाची माहिती व जागरूकतेसह बंदीच्या अंमलबजावणीची माहिती युवावर्गाला होणे आवश्यक आहे. आमच्या या सर्वेक्षणानंतर विद्यार्थी प्लॅस्टिकबंदीबाबत जागरूक झाल्याचे पाहायला मिळत आहे. अनेकांनी प्लॅस्टिक न वापरण्याचा निर्धार केला आहे. त्यामुळे शिक्षक म्हणून विद्यार्थ्यांना आणि त्यानिमित्ताने समाजाला शाश्वत विकासाकडे नेण्यास जर कोणत्याही रूपाने मदत करता येणे शक्य असेल तर ती करायला हवी.
- अवकाश जाधव, प्राध्यापक, सेंट झेविअर्स महाविद्यालय

Web Title: Plastically responsible for Mumbai's Tumbi!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.