10 रुपयांची थाळी अन् 15 रुपयांची पाणी बॉटल, शिवभोजनानंतर आव्हाड ट्रोल
By ऑनलाइन लोकमत | Published: January 26, 2020 05:07 PM2020-01-26T17:07:41+5:302020-01-26T17:10:24+5:30
राज्यातील बहुतांश जिल्ह्यात प्राथमिक स्तरावर आज शिवभोजन केंद्रे सुरू करण्यात आली आहेत.
मुंबई - राज्यातील विविध जिल्ह्यात पालकमंत्र्यांच्या हस्ते शिवभोजन केंद्राचे उदघाटन करण्यात आले. विशेष म्हणजे शिवसेनेच्या या महत्वाकांक्षी योजनेत सहभागी होताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जेवण टाळले. तर छगन भुजबळ यांनी स्वहस्ते भोजनाच्या थाळी तयार करून लाभार्थी नागरिकांना दिल्या.
राज्यातील बहुतांश जिल्ह्यात प्राथमिक स्तरावर आज शिवभोजन केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. या थाळी मुळे गरिबांची भूक भागणार असून बचत गटांना रोजगारही मिळणार आहे. शिवभोजन योजना ही राज्यातील गोरगरीब नागरिकांसाठी कमी दरात पोटभर जेवण देणारी सरकारची अत्यंत महत्वकांक्षी योजना आहे. गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनीही शिवभोजन केंद्राचे उद्घाटन केले. त्यानंतर, 10 रुपयातील थाळीचा आस्वादही त्यांनी घेतला. मात्र, आव्हाड यांच्यासोबत 10 रुपयांच्या थाळीसोबत 10 ते 15 रुपयांची पाण्याची बाटली असल्याचा फोटो व्हायरल होत आहे. 10 रुपयांच्या थाळीसोबत पाण्याची बाटलीही मिळणार का? असा प्रश्न नेटीझन्स विचारत आहेत. विशेष, म्हणजे 10 रुपयांच्या थाळीसोबत 10 ते 15 रुपयांची पाणीबॉटल असल्याने गरिबांनाही थाळीसोबतच पाणी बॉटल मिळणार का, असे म्हणत आव्हाड यांचा फोटो व्हायरल करण्यात येत आहे. आव्हाड यांच्या फेसबुक आणि ट्विटर अकाऊंटवरही नेटीझन्सने टीकात्मक प्रश्न विचारले आहेत.
दरम्यान, प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने राज्यभर पन्नासहुन अधिक ठिकाणी शिवभोजन प्रकल्प सुरू होत आहे. अनेक जिल्हयामध्ये प्राथमिक स्वरूपात पालकमंत्र्यांच्या हस्ते या योजनेचे उदघाटन करण्यात आले. शिवभोजन केंद्रावर स्वच्छ स्वरुपात आणि चांगल्या दर्जेचे जेवण सर्वसामान्य नागरिकांना उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यानुसार शिवभोजन केंद्रांची व त्याअंतर्गत दिल्या जाणाऱ्या भोजनाची नियमित तपासणी करण्यात येणार आहे.