मुंबई - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व रेल्वे गाड्या बंद आहेत, त्यामुळे रेल्वेचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान होत आहे. परंतु ते भरून काढण्यासाठी यापुढे मालवाहतूक वाढविण्यासाठी रेल्वेचे प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रेल्वे गाड्यांचे वेळापत्रक बदलण्याचे काम सर्व स्तरावर सुरू आहे. तर, सरकारच्या परवानगीनेच विशेष गाड्या सोडण्यात येत आहेत. मुंबईची लाईफलाईन असलेली लोकल रेल्वेसेवाही गेल्या अनेक दिवसांपासून बंद आहे. केवळ अत्यावश्यक सेवेतील नागरिकांना रेल्वे स्थानकावर प्रवेश देण्यात येतो. मात्र, पुणे रेल्वे स्थानकावर प्लॅटफॉर्मचे तिकीट 50 रुपये केल्यामुळे नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.
देशभरातील रेल्वे गाड्यांच्या खासगीकरणावरून मोठा वाद सुरू आहे. मोदी सरकारच्या या निर्णयावर विरोधकांनी सडकून टीका केली आहे. त्यानंतर कोणत्याही प्रकारे रेल्वेचे खासगीकरण केले जाणार नाही, असं रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी स्पष्ट केलं आहे. सध्या कार्यरत असलेल्या रेल्वेच्या सर्व सेवा चालविल्या जातील. रेल्वे मंत्रालयाने खासगी कंपन्यांना 109 मार्गावर प्रवासी गाड्या चालविण्यास दिल्या होत्या. ज्यामध्ये खासगी कंपन्यांना 30 हजार कोटींची गुंतवणूक करावी लागली. त्यानंतर गाड्यांच्या खासगीकरणाबाबत चर्चा सुरू झाल्या. मात्र, या खासगीकरणाला अनुसरुनच सोशल मीडियावर एक मेसेज व्हायरल होत आहे. रेल्वेनं खासगीकरण केल्यामुळे पुणे रेल्वे स्थानकावर प्लॅटफॉर्म तिकीट 50 रुपये करण्यात आलंय. पुणे रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म तिकीटाच्या फोटोसह हा मेसेज सोशल मीडियात व्हायरल होत आहे. मात्र, या तिकीटामागील सत्य वेगळंच आहे. याबाबत पुणे रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी मनोज झंवर यांनी माहिती दिली आहे.
देशात लॉकडाऊनची घोषणा केल्यानंतर, रेल्वेसेवा बंद करण्यात आली आहे. केवळ अत्यावश्यक सेवेसाठीच रेल्वेचा वापर होत आहे. रेल्वे स्थानकावर गर्दी होऊ नये, प्रवाशांनी विनाकारण फेरफटका मारु नये म्हणून पुणे रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म तिकीट 50 रुपये करण्यात आलंय. सध्या केवळ बुकिंग कन्फर्म असणाऱ्या प्रवाशांनाच रेल्वे स्थानकावर प्रवेश दिला जातो. मात्र, अत्यावश्य सेवा देणाऱ्यांसोबत किंवा काही वैद्यकीय सेवेतील प्रवाशांसोबत नातवाईकही रेल्वे स्थानकावर येतात. मात्र, लॉकडाऊनच्या नियमांचं पालन व्हावं आणि गर्दी टाळावी यासाठी हे तिकीट 50 रुपये करण्यात आल्याचं मनोज झंवर यांनी लोकमतशी बोलताना सांगितलं.
लॉकडाऊन पूर्वी हे तिकीट 10 रुपये होतं. केवळ लॉकडाऊन काळातील सेवेसाठी हा निर्णय घेण्यात आला असून रेल्वेच्या खासगीकरणासाठी याचा काहीही संबंध नसल्याचेही झंवर यांनी स्पष्ट केले. तसेच, रेल्वे सेवेसंदर्भात पुढील आदेश आल्यानंतर तिकीटाच्या दराबाबत विभागीय प्रमुखांकडून निर्णय घेतला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या देशातील रेल्वे सवा बंद असून केवळ अत्यावश्यक सेवांसाठीच रेल्वे गाड्यांना परवानगी देण्यात आली आहे. त्यातच, महाराष्ट्र सरकारच्या परवानगीनेच मुंबई आणि पुण्यातून रेल्वे गाड्या सोडण्यात येतात. पुण्यातूनही काही रेल्वे गाड्या सोडण्यात येत आहेत. मात्र, याच काळात रेल्वेनं सुरक्षितता आणि गर्दी टाळण्यासाठी काही नियम लागू केले आहेत. त्यानुसार, रेल्वे प्लॅटफॉर्मचे तिकीट 50 रुपये करण्यात आले आहे.