प्लॅटफॉर्म तिकीट विक्री बंद; महत्वाच्या रेल्वे स्थानकांवर प्रवाशांची गर्दी, रेल्वे प्रशासनाकडून आढावा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2023 10:48 AM2023-11-17T10:48:33+5:302023-11-17T10:49:11+5:30
या गर्दीचा मध्य रेल्वेकडून सातत्याने आढावा घेतला जात आहे.
मुंबई : दिवाळी सुट्यांच्या पार्श्वभूमीवर अनेकांनी गावची वाट धरली आहे. त्यामुळे राज्यासह उत्तर भारतात जाणाऱ्या बहुतांश रेल्वे गाड्या पूर्ण क्षमतेने भरून जाताना दिसत आहेत. त्यामुळे प्रवाशांची गर्दी रोखण्यासाठी मध्य रेल्वेने १६ ते २४ नोव्हेंबर दरम्यान प्लॅटफॉर्म तिकीट विक्री बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, लोकमान्य टिळक टर्मिनस, कल्याण, ठाणे, दादर, पनवेल या स्थानकांवर प्रवाशांची गर्दी होत आहे.
या गर्दीचा मध्य रेल्वेकडून सातत्याने आढावा घेतला जात आहे. आरपीएफ आणि जीआरपी जवानांची संख्या वाढवण्यात आली आहे. खबरदारी म्हणून मध्य रेल्वेने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, लोकमान्य टिळक टर्मिनस, कल्याण, ठाणे, दादर आणि पनवेल या सहा स्थानकात प्लॅटफॉर्म तिकीट विक्री बंद केली आहे. प्रत्येक शिफ्टला ७ आरपीएफ जवान तैनात करण्यात आले असून, जवानांना सूचना देण्यासाठी मेगाफोन देण्यात आले आहेत. तसेच श्वान पथक तैनात राहणार आहे.