मुंबई : गर्दीचे रेल्वे स्थानक अशी ख्याती असलेल्या दादर रेल्वे स्थानकात लोकल, मेल-एक्स्प्रेसच्या प्रवाशांची गैरसोय होऊ नये तसेच, परगावाहून येणाऱ्या प्रवाशांचा गोंधळ उडू नये, म्हणून रेल्वे प्रशासनाने या स्थानकातील फलाटांचे क्रमांक बदलले. त्यानंतर मध्य रेल्वे मार्गावरील फलाट क्रमांक ८ चे काम हाती घेतले. मात्र हे काम करताना प्रवाशांची सोय होण्याऐवजी गैरसोय होत आहे. धीम्या मार्गावरील जिन्यासह फलाटावरील गर्दीचे व्यवस्थापन करताना तैनात पोलिसांच्या नाकीनऊ येत असून, ऐन गर्दीच्या वेळी प्रवाशांचे लोंढे वाढतच आहेत.
मध्य रेल्वेवर दादर येथे ठाण्याच्या दिशेने जाणाऱ्या धीम्या मार्गावरील फलाट आणि सीएसएमटी दिशेकडे जाणाऱ्या लोकलचे फलाट एकच होते. त्यामुळे या फलाटांवर एकच वेळी दोन लोकल आल्यावर प्रवाशांची मोठी गर्दी होत असे. परिणामी पूल चढण्यासाठी प्रवाशांना फलाटावर थांबावे लागत होते. या गर्दीवर उतारा म्हणून सीएसएमटीकडे जाणाऱ्या रूळावर फलाट बांधून प्रवाशांना रेल्वेने मोठी जागा उपलब्ध करून दिली. मात्र, येथे सध्या काम सुरू असल्याने नोकरदार वर्गासह इतर प्रवाशांना गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे.
उतारा काय?
जिन्याखाली उतरणाऱ्या ठिकाणी येणाऱ्या आणि जाणाऱ्या प्रवाशांच्या सोयीसाठी प्लॅस्टिकचा मोठा दोरखंड बांधला आहे. मात्र सकाळी आणि सायंकाळी येथील गर्दी आवरताना पोलिसांच्या नाकीनऊ येत आहे.
दुरुस्ती सुरू असतानाच जिन्याचा वापर -
फलाट क्रमांक ११ वरील जिन्याची दुरुस्ती सुरू आहे. अशावेळी हा जिना बंद असणे गरजेचे आहे. मात्र प्रवासी बिनदिक्कत यावरून फिरत आहेत. त्यामुळे कामादरम्यान प्रवाशांना दुखापत होण्याची भीती आहे.
धिम्या मार्गावर ठाण्याकडे जाणाऱ्या प्रवाशांना फलाटावर ऐसपैस जागा मिळाली आहे. पण जागा फलाटावरील मधल्या भागात असल्याने सुरुवातीला मात्र प्रवाशांना अडचणी येत आहेत. ठाण्याकडील खाली उतरणाऱ्या जिन्यावरील पत्रे काढून टाकल्याने प्रवाशांना भरदुपारी उन्हातान्हात जिने उतरावे आणि चढावे लागत आहेत. जिन्यालगत सुरू असलेल्या कामामुळे फलाट अरुंद झाला असून, येथील गर्दी एकाच ठिकाणी थांबून राहत असल्याने प्रवाशांच्या त्रासात भरच पडत आहे.