प्लॅस्टिकबंदी कारवाईतून ७० हजारांचा दंड वसूल
By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2018 05:22 AM2018-09-17T05:22:22+5:302018-09-17T05:22:55+5:30
मुंबई महापालिकेकडून या प्रकरणी कारवाई केली जात असताना, दुसरीकडे मुंबईकरांकडून खुलेआमपणे प्लॅस्टिक वापरले जात असल्याचे चित्र आहे.
मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरात प्लॅस्टिकबंदीचा फज्जा उडाला असला, तरी मुंबई महापालिकेने या प्रकरणी केलेल्या कारवाईत तब्बल ७० हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. महत्त्वाचे म्हणजे, मुंबई महापालिकेकडून या प्रकरणी कारवाई केली जात असताना, दुसरीकडे मुंबईकरांकडून खुलेआमपणे प्लॅस्टिक वापरले जात असल्याचे चित्र आहे. परिणामी, प्लॅस्टिकवर कायमस्वरूपी केव्हा बंदी येणार? हा प्रश्न निरुत्तरितच आहे.
मुंबई महापालिकेच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई महापालिकेच्या पथकाद्वारे शनिवारी ६३५ दुकाने आणि आस्थापनांना भेटी देण्यात आल्या. याद्वारे ३६.४०० किलोग्रॅम प्लॅस्टिक जप्त करण्यात आले, तर ७९२ परवानेधारक विक्रेत्यांना भेटी देण्यात आल्या. या भेटीदरम्यान ९ हजार ७०० किलोग्रॅम प्लॅस्टिक जप्त करण्यात आले, तर बाजारांचा विचार करता १ हजार १९७ ठिकाणी भेटी देण्यात आल्या. या सर्व कारवाईचा विचार करता, एकूण २ हजार ६२४ ठिकाणांना भेटी देत ४६.१०० किलोग्रॅम प्लॅस्टिक जप्त करण्यात आले. या संपूर्ण कारवाईतून ७० हजार रुपये एवढा दंड वसूल करण्यात आला.
जनजागृतीनंतरही वापर सुरू
मुंबई शहर आणि उपनगरावर सद्यस्थितीमध्ये गणेशोत्सवाचा फिव्हर आहे. मुंबईकर गणेशोत्सवात न्हाऊन निघाले आहेत. महत्त्वाचे म्हणजे, गणेशोत्सवात सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांकडून प्लॅस्टिक विरोधात आणि प्लॅस्टिकबंदीबाबत जनजागृती केली जात आहे. मुंबई महापालिकेने या जनजागृतीला हातभार लावला आहे. मात्र, जनजागृती अद्यापही कुठे तरी कमी पडत असल्याचे चित्र आहे.