- रोहित नाईक, मुंबई‘डब्ल्यूडब्ल्यूई’ने माझ्या आयुष्याला कलाटणी मिळाली. प्रेक्षकांनी दिलेल्या प्रेमामुळेच खलीचा ‘द ग्रेट खली’ झाला. तुम्ही आयुष्यात कोणताही खेळ खेळा, पण अवश्य खेळा असा सल्ला दिला आहे डब्ल्यूडब्ल्यूईतील पहिला भारतीय रेसलर दलिप सिंग राणा अर्थात ‘खली’ याने. टोटल नॉनस्टॉप रेसलिंग (टीएनए) या लोकप्रिय रेसलिंग खेळाचे सामने पुढील महिन्यात मुंबईत होणार असून यानिमित्ताने खली भारतातील नवोदित रेसलर्सचा शोध घेणार आहे. यानिमित्ताने त्याने ‘लोकमत’सह बातचीत केली. विशेष म्हणजे या वेळी टीएनएमधील पहिला भारतीय मल्ल महाबली शेरा यानेही संवाद साधला.मुलांनी खेळ अवश्य खेळावे. विविध क्रीडा प्रकारांमुळे वैयक्तिक विकास होतो. उत्तम शरीरयष्टी होते. त्याचवेळी कधीही व्यसनांच्या आहारी जाऊ नका, असा सल्ला खलीने लहान मुलांना दिला. टीएनए टॅलेंट शो बाबतीत खली म्हणाला की, या स्पर्धेद्वारे नवोदितांना आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकण्याची सुवर्णसंधी असेल. याचा युवा मल्लांनी फायदा घ्यावा. रेसलिंग कोणीही करू शकतो. मात्र त्यासाठी जिद्द आणि कठोर मेहनतीची तयारी असावी. या टॅलेंट स्पर्धेतून मी काही भारतीय मल्लांची निवड करणार असून त्यांना टीएनए रेसलिंग स्पर्धेत आपली चमक दाखवण्याची संधी मिळेल. तसेच रेसलिंग शिकण्याची इच्छा असलेल्यांना मार्गदर्शन करण्याचे आश्वासनही खलीने दिले.भारताचा पहिला टीएनए रेसलर महाबली शेरा याने ‘लोकमत’ला सांगितले की, ४ डिसेंबरला मुंबईत पहिल्यांदा टीएनए रेसलिंगची लढत आयोजित करण्यात येणार असून भारतीयांना प्रत्यक्षात या खेळातील थरार अनुभवता येईल. या दरम्यान घेण्यात येणाऱ्या टॅलेंट हंटमधून एकाला माझ्यासह टीएनए स्टेजवर खेळण्याची संधी मिळेल. दिग्गज रेसलर कर्ट अँगलच्या मार्गदर्शनाखाली तयार झालेल्या शेराने सांगितले की, कर्ट अँगल अप्रतिम आहे. तो नेहमी मदतीसाठी तयार असतो. ज्या ज्यावेळी मला गरज असते त्या त्या वेळी तो मला मार्गदर्शन करीत असतो.भारताचा पहिला टीएनए रेसलर बनेन याबाबत मी केवळ स्वप्न पाहिले होते. पण आज ते स्वप्न पूर्ण केल्याचा आनंद आहेच शिवाय जबाबदारीही वाढली आहे. भारताचे प्रतिनिधित्व करीत असल्याने देशाचे नाव उंचावण्याची जबाबदारी कायम असते आणि यामध्ये यशस्वी ठरण्याचा माझा पुरेपूर प्रयत्न असतो.- महाबली शेरा
कोणताही खेळ खेळा, पण अवश्य खेळा - खली
By admin | Published: October 20, 2015 2:29 AM