रंगपंचमी खेळा, पण जपून!
By Admin | Published: March 21, 2016 02:16 AM2016-03-21T02:16:04+5:302016-03-21T02:16:04+5:30
रंगपंचमी हा रंगांचा सण आहे, पण बेधुंदपणे रंगपंचमी खेळून रंगाचा बेरंग करू नका, असा सल्ला डॉक्टरांनी मुंबईकरांना दिला आहे. सध्या राज्यात दुष्काळ आहे, त्यामुळे पाण्याचा वापर टाळा
मुंबई : रंगपंचमी हा रंगांचा सण आहे, पण बेधुंदपणे रंगपंचमी खेळून रंगाचा बेरंग करू नका, असा सल्ला डॉक्टरांनी मुंबईकरांना दिला आहे. सध्या राज्यात दुष्काळ आहे, त्यामुळे पाण्याचा वापर टाळा आणि सुरक्षित रंगपंचमी खेळा, असेही आवाहन करण्यात आले आहे.
अनेकदा नैसर्गिक रंगाने रंगपंचमी खेळतो, म्हणजे सुरक्षित रंगपंचमी खेळतो, असे सामान्यांचे मत आहे, पण हे चुकीचे आहे. कारण नैसर्गिक रंग वापरले, तरीही त्यामध्ये डोळा, त्वचेला हानिकारक असणाऱ्या घटकांचा समावेश असतो. त्यामुळे नैसर्गिक रंग असला, तरीही चेहऱ्याला रंग लावणे टाळा. जे. जे. रुग्णालयातील नेत्रचिकित्सा विभागप्रमुख डॉ. रागिणी पारेख यांनी सांगितले, ‘डोळ्यात शुद्ध पाण्याव्यतिरिक्त अन्य कोणताही घटक गेल्यास, त्यामुळे हानी होण्याचा धोका अधिक असतो. नैसर्गिक रंगही डोळ्यात गेल्यास त्यामुळे डोळा लाल होणे, डोळ्याला खाज येणे असा त्रास होतो. दर वर्षी रुग्णालयात रंगपंचमीनंतर अशा केसेस येतात. त्यात काही जणांना आपली दृष्टी गमवावी लागते. रंगपंचमी खेळताना डोळ्यात रंग गेल्यास, तत्काळ स्वच्छ पाण्याने डोळा धुवा. डोळ्यात कुठल्याही प्रकारचे औषध टाकू नका. डोळ्याला जास्तच त्रास होतोय, असे वाटल्यास डोळ्याच्या डॉक्टरकडे जा. (प्रतिनिधी)
रंगामुळे त्वचेला कोणता त्रास उद्भवू शकतो?
त्वचा लाल होते, पाण्याचे फोड येतात, अॅलर्जी असल्यास त्वचेला खाज सुटते, त्वचेचे पातळ पापुद्रे निघतात, जास्त काळ कपडे ओले राहिल्यास कॅनडिडा होतो. कॅनडिडा म्हणजे शरीरातील ज्या भागांना घडी पडते, म्हणजे हात, पाय अशा ठिकाणी संसर्ग होतो.
डोळ्यांची
अशी घ्या काळजी...
कोणीही चेहऱ्याला रंग लावत असल्यास डोळे बंद करून घ्या. डोळ्यात रंग गेल्यास हात धुऊन डोळा स्वच्छ पाण्याने धुवा.
पाण्याचा फुगा डोळ्यावर बसल्यास बर्फाने शेका. डोळा दुखायला लागला, लाल झाल्यास तत्काळ डॉक्टरकडे जा. कॉन्टॅक्ट लेन्स लावून रंगपंचमी खेळायला जाऊ नका.
सुरक्षित रंगपंचमी खेळायची असेल, तर फक्त पाण्याने अथवा नैसर्गिक रंगांनी खेळा. शरीराचा अधिकांश भाग झाकला जाईल, असे कपडे घालून रंगपंचमी खेळा. रंगपंचमी खेळायला जाण्याआधी त्वचेला तेल अथवा क्रीम लावा.
केसाला तेल लावून रंग खेळायला जा. रंग काढण्यासाठी रॉकेल, लिंबाचा वापर करू नका. रंग काढण्यासाठी त्वचेवर साबण घासू नका. रंग काढण्यासाठी दूध, बेसन लावावे.
नखांमध्ये अडकलेला रंग काढण्यासाठी तीक्ष्ण वस्तूंचा वापर करू नये. सुक्या रंगाने रंगपंचमी खेळला असाल, तर केस धुण्याआधी सर्व रंग झटकून काढा.
रंगपंचमी खेळताना लहान मुलांची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. कारण रंग खेळल्यावर त्यांच्या नखात अनेकदा रंग अडकून राहतो. त्याच हाताने त्यांनी काही खाल्ल्यास त्यांना पोटदुखीचा त्रास होऊ शकतो. अनेकदा उत्साहात रंगपंचमी खेळताना मुलांच्या तोंडात रंग जातो. त्यामुळेही त्यांच्या घशाला, पोटाला त्रास होऊ शकतो. त्यामुळे लहान मुलांची विशेष काळजी घेतली पाहिजे. रंगांमुळे त्वचेला त्रास होतो. त्वचेचा रंग काढण्यासाठी लिंबू, रॉकेलचा वापर करू नये. त्यामुळे त्वचेला अधिक इजा होऊ शकते.
- डॉ. वरदा वाटवे,
फॅमिली फिजिशियन