रंगो से खेलो रे होली
By admin | Published: March 2, 2015 10:53 PM2015-03-02T22:53:28+5:302015-03-02T22:53:28+5:30
आज गोकुळात रंग खेळतो हरी, राधिके जपून जा तुझ्या घरी़ हा राधा कृष्णाच्या प्रेमाची रंग बरसात करणारा धुलीवंदन हा भारतीय संस्कृतीत सगळ््यात मोठा सण आहे.
आज गोकुळात रंग खेळतो हरी, राधिके जपून जा तुझ्या घरी़ हा राधा कृष्णाच्या प्रेमाची रंग बरसात करणारा धुलीवंदन हा भारतीय संस्कृतीत सगळ््यात मोठा सण आहे. आधुनिक काळात त्याचे रूप पालटले आहे. आणि नैसर्गिक रंगाची जागा रासायनिक रंगानी घेतली आहे. त्यामुळे होळीच्या रंगाचा बेरंग होतो. होळीचा खरा आनंद घेण्यासाठी इको फे्रंडली रंगो से खेलो रे होली, जल्दही ये रंग उतरेगा असे म्हणायची वेळ आली आहे. कॉलेजातील तरूणाईला कोणत्या रंगात रंगणे आवडते. त्यांच्या धुलीवंदनाच्या काय पद्धती आहे. नेमकी कशा प्रकारे ही तरूण मंडळी रंगात न्हातात. त्यातही तरूणींना होळी खेळणे सुरक्षित वाटते का? होळीसाठी वृक्षाची तोड करणे कितपत योग्य आहे? युवा पिढीच्या मनातील सण नेमका कसा आहे. हे जाणून घेण्यासाठी डोंबिवलीतील मॉडेल कॉलेजात शिकणाऱ्या तरूणाईशीच संवाद साधला...
कोकणातील होळी
कोकणात होळीचा दिमाख काही औरच असतो. तळकोकणात तर त्याहून वेगळा असतो. गणेशोत्सवाप्रमाणे होळीतही दर दिवशी पंचपक्वान्नांचा थाट असतो. या दिवशी काही भागात पुरणपोळी तर काही भागात तांदळांच्या शेवया केल्या जातात. पुरणपोळीचा थाट तर काही भागात असतोच मग त्यानंतर वडे-सांबार, आंबोली, खापरोळी अशी मालिकाच सुरू होते.
तळकोकणात जेथे चव्हाट्यावर देवस्वाऱ्या पोहोचतात तेथे तेथे पारध करण्याचीही परंपरा आहे. जंगली प्राण्यांचे मांस शिजवून सर्व गाव एकत्र येऊन त्यांचे सेवन करतो. रत्नागिरीत होळीच्या दिवशी पालख्या नाचवितात. तर आदल्या दिवशीपासूनच गावागावात असणाऱ्या मांडांवर तमाशांचे फड रंगू लागतात. राधा,नाच्या यांच्या डफावरच्या बतावण्या सुरू होतात. सोंगे आणली जातात.
या दिवसांत शबय मागणारी व देणारी ही लोके येथे दिसून येतात. या बदल्यात होणारे व्यवहार ही ठरलेले असतात. शबय मागण्याचे प्रकार ही वेगवेगळे आहेत. या दिवसांत अंगणात कुणीही चप्पल घालून येत नाही. घराघरात होळीच्या अखेरच्या टप्प्यात ग्रामदेवतेचे निशाण दाखल होते. ढोलांच्या विशिष्ट नादांत येणाऱ्या या निशाणांचे स्वागत झाल्यावर होणारे नृत्य, आरती या परंपरा म्हणजे येथील संस्कृतीचा वेगळाचा दिमाख पाहायला मिळतो.
१. आज गोकुळात रंग खेळतो हरी
२. होळींचे सोंग घेऊन...
३. खेळताना रंग बाई होळीचा
हिंदीतील होळीची गाणी
१. रंग बरसे भिगे चुनारवाली...
२.होली के दिन दिल मिल जाते है
३. बलम पिचकारी तुने मुझे मारी..
रंग बरसे हे प्रसिध्द संत मीराबाई यांचे भजन आहे. त्यांच्या भजनाच्या ओळी घेऊन हिंदीतील ज्येष्ठ कवीवर्य हरिबंशराय बच्चन यांनी रंग बरसे हे सिलसिला चित्रपटातील गाणे लिहीले. ते उत्तरभारतातील लोकसंगीतावर आधारित लोकगीत आहे. त्याला अभिनय सम्राट अमिताभ बच्चनचा आवाज लाभल्याने आजही ते होळी गीत म्हणून प्रसिध्द आहे. आॅल टाईम हीट गाण्यात आजही त्याची गणणा केली जाते.
परिक्षांचे टेन्शन..वर्षभर केलेली घोकंपट्टी...ती आठवत आठवतच गेल्या काही दिवसांत रात्र-रात्र जागून केलेला अभ्यास... अभ्यास झालाच नाही या भावनेने झोप उडणे अशी परिस्थिती एकीकडे असताना दुसरीकडे रंगाचा उत्सव रंगपंचमी अवघ्या तीन दिवसांवर येऊन ठेपला आहे. रंगात न्याऊन निघायला तर सर्वांनाच आवडत असते. सध्या कॉलेज कॅम्पसमध्ये ही असाच काही मौहोल पाहायला मिळत आहे. रंगपंचमीच्या तीन-चार दिवस आधीपासूनच रंग उधळण्यास सुरूवात झाली आहे. काही विद्यार्थी बाईकवरून जाता-येता आपल्या मित्र-मैत्रिणींवर रंग उधळत आहेत. याला कॉलेजच्या मॅनेजमेंटकडून परवानगी नसली तरी कॉलेजियन्स शिस्तीचा भंग करीत नसल्याने त्याला विरोध केला जात नाही. त्यामुळे कॉलेजियन्सनाही होळीचा आनंद लुटता येत आहे.
एम.कॉमचा अभ्यास करणारा सौरभ वैद्य याने सांगितले की, लहानपणापासूनच होळी खेळतो. लहानपणी रंगाचे ज्ञान नव्हते. त्यामुळे रासायनिक रंगाने ती खेळत होतो. त्यावेळी कोणाला इजा झाली नसली तरी समज आल्यावर रासायनिक रंग हे शरीराला घातक असतात. हे कळाल्यावर नैसर्गिक रंगाचा वापर करून तिचा आनंद घेतो. सोसायटीत आणि सोसायटीच्या बाहेर जाऊनही हा आनंद आम्ही घेतो. पण सोसायटीत होळी खेळण्याची मजा काही औरच आहे. सोसायटीतील महिला वर्ग ही या तीत सहभाग घेतात. सोसायटीतील होळी महिलांसाठी अधिक सुरक्षित आहे असे मला वाटते. सगळ््यांनी नैसर्गिक रंगाचा वापर करावा यासाठी मी नेहमीच आग्रही असतो. समाजात बऱ्यापैकी नैसर्गिक रंगाचा अवरनेस आला आहे. त्यामुळे आता कमी प्रमाणात नैसर्गिक रंगाचा वापर केला जात असल्याचे दिसून येत आहे.
बुरा ना मानो
म्हणून रंगाचा बेरंग होणे टाळावे
एसवाय बीकॉमच्या वर्गात शिकणारी कृषिका बने हिने सांगितले की, लहानपणापासूनच मी होळी खेळते. पण कधीही रासायनिक रंगाचा वापर आतापर्यंत केला नाही. सोसायटीत व घरातून पाण्याचा जास्त वापर करू दिला जात नाही. त्यामुळे आधी सुके रंग वापरून एकमेकांच्या चेहऱ्याला लावतो. त्यानंतर ओल्या रंगाचा वापर करून ती खेळतो. थोडे पाणी घरातून घेऊन व थोडे सोसायटीतून पाणी घेऊन तिचा आनंद घेतो. पाण्याचा भरमसाठ वापर टाळला तरच आपण नैसर्गिक होळीचा आनंद घेतला असे मला वाटते. कॉलेजात तिच्या दोन-तीन दिवस आधीच रंग उधळण्यास सुरूवात होते. शिस्तीत कॉलेजात रंग उडविण्यास फारसा मज्जाव केला जात नाही. त्याला वेगळे वळण लावू दिले जात नाही. आमच्या सोसायटीत होळी पेटविली जाते. परिसरात अनेक होळ््या पेटविण्याऐवजी एकच पेटवावी असा विचार पुढे आला होता. पण तो शक्य नसल्याने प्रत्येक जण वेगवेगळी होळी पेटवितात. शेणाच्या गोवऱ्या, सोसायटीच्या परिसरात असलेल्या वृक्षांच्या पावसाळ््यात तोडण्यात आलेल्या फांद्या, नारळाच्या करवंटया, शेंडी व सुकलेला झाडपाला याचा वापर करून ती पेटविली जाते. त्यातून पर्यावरणाची हानी टाळणे हा मुख्य उद्देश जोपासला जातो. तसेच महिलांनी बाहेर न पडता सोसायटीच्या आवारात ओळखीच्या लोकांबरोबर सुरक्षित होळी खेळावी.
जान्हवी मोर्ये