कामोठेत खेळाची मैदाने, उद्यानांचा अभाव
By admin | Published: June 25, 2015 11:10 PM2015-06-25T23:10:12+5:302015-06-25T23:10:12+5:30
नवी मुंबईमधील सिडकोने उभारलेल्या कामोठे शहराची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. येथील ४३ सेक्टरमधील दोन लाख लोकसंख्येच्या शहरात सध्या एकही
वैभव गायकर, पनवेल
नवी मुंबईमधील सिडकोने उभारलेल्या कामोठे शहराची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. येथील ४३ सेक्टरमधील दोन लाख लोकसंख्येच्या शहरात सध्या एकही खेळाचे मैदान अथवा उद्यान मुलांना खेळण्यासाठी तसेच नागरिकांना विरंगुळ्यासाठी नाही. सिडकोने याच परिसरात उद्यान किंवा मैदानासाठी जागा उपलब्ध करून देण्याची मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे.
प्राथमिक सुविधांपासून वंचित राहिलेल्या कामोठेवासीयांच्या समस्या दिवसेंदिवस वाढत आहेत. शहरात प्रवेश करण्याचा रस्ता देखील सायन-पनवेल महामार्गाच्या रुंदीकरणाच्या कामामुळे बंद झाला आहे. येथील रहिवाशांना विरंगुळ्यासाठी अथवा परिसरात फेरफटका मारता येईल, अशाप्रकारची कोणतीच व्यवस्था सिडकोने केलेली नाही.
कामोठे शहरालगत असलेल्या खारघर शहरात प्रत्येक सेक्टरमध्ये एक गार्डन अथवा, खेळाचे मैदान उभारले आहे. तसेच सेन्ट्रल पार्क, गोल्फ कोर्ससारखे आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रकल्प उभारले आहेत. मात्र कामोठेकरांबाबत दुजाभाव होत असल्याचे रहिवाशांचे म्हणणे आहे.
कामोठेमधील निवडून आलेले पनवेल पंचायत समिती सदस्य व विद्यमान पंचायत समितीचे उपसभापती सखाराम पाटील यांनी सांगितले की, अनेक वेळा पत्रव्यवहार करून सिडकोकडून दुर्लक्ष होत आहे. नागरिकांसाठी उद्याने नाहीत, मुलांना खेळण्यासाठी मैदाने नाहीत. कामोठेमधील अनेक भूखंड सिडकोने उद्योजकांच्या घशात घातले असल्याचा आरोप यावेळी सखाराम पाटील यांनी केला आहे.
कामोठे शहरात जिल्हा परिषदेच्या वतीने प्राथमिक आरोग्य केंद्र उभारण्यासाठी सिडकोकडे जागेची मागणी केली आहे, मात्र सिडको या विषयावर टोलवाटोलवी करीत असल्याचेही पाटील यांनी
सांगितले.