हातभट्ट्यांवर छापे मारण्याचे नाटक
By admin | Published: June 23, 2015 11:27 PM2015-06-23T23:27:33+5:302015-06-23T23:27:33+5:30
मालाड मालवणी येथे विषारी दारूचे प्रकरण घडल्यानंतर वसई-विरार भागातील एक्साईज आणि पोलीस यंत्रणेला जाग आली.
वसई : मालाड मालवणी येथे विषारी दारूचे प्रकरण घडल्यानंतर वसई-विरार भागातील एक्साईज आणि पोलीस यंत्रणेला जाग आली. सोमवारी त्यांनी अर्नाळा किल्ल्यामध्ये धाडी टाकल्या. परंतु त्या केवळ दिखाऊ होत्या. अर्नाळा किल्ल्यात प्रचंड प्रमाणात गावठी दारूचे उत्पादन होत असते. परंतु पोलिसांनी केवळ ७०० रू. ची दारू पकडली. पोलिसांच्या या कारवाईची खिल्ली उडविली जात आहे.
अर्नाळा किल्ल्यात गेली अनेक वर्षे हातभट्ट्या लागतात. येथे लाखो रुपयांच्या गावठी दारूचे उत्पादन होत असते. ही दारू पालघर जिल्ह्यातील विविध भागात पाठवली जाते. या सर्व हातभट्ट्या स्थानिक पोलिसांच्या आशीर्वादाने सुरू असतात. यामध्ये काही राजकीय पदाधिकारीही सामील आहेत. दर महिना ठराविक हप्ता पोलीस व एक्साईजच्या अधिकाऱ्यांना जातो. ३ दिवसापूर्वी मालाड मालवणी येथे झालेल्या घटनेनंतर पोलीस व एक्साईजच्या अधिकाऱ्यांनी आपल्या फौजफाट्यासह अर्नाळा किल्ला गाठला परंतु याची आगाऊ माहिती मिळत असल्यामुळे भट्टीवाल्यांना पळून जाणे सहज शक्य झाले. (प्रतिनिधी)