Join us  

प्रवाशांच्या जीवाशी रोज खेळ सुरू! अंबरनाथ, बदलापूरकर कायमच ‘स्टँडिंग’ 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2024 10:58 AM

बदलापूरकर, अंबरनाथकरांसाठी लोकलचा प्रवास म्हणजे एक अग्निदिव्यच आहे.

स्वप्निल कुलकर्णी

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : बदलापूरकर, अंबरनाथकरांसाठी लोकलचा प्रवास म्हणजे एक अग्निदिव्यच आहे. लोकलला इतकी गर्दी असते की मुंगीलाही डब्यात शिरता येणार नाही. याच गर्दीतून डब्याला लटकून बदलापूर, अंबरनाथकर रोज आपला जीव धोक्यात घालून ‘स्टँडिंग’ प्रवास करत असतात; मात्र त्याच्याशी रेल्वेला काही देणे-घेणे नाही. गेल्या काही काळापासून कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ आणि बदलापुरात प्रवाशांची गर्दी वाढली आहे. फक्त पुरुषच नाही तर महिला प्रवाशांचीही संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे; पण प्रवाशांच्या वाढलेल्या संख्येनुसार लोकलच्या फेऱ्या मात्र वाढलेल्या नाहीत. त्यामुळे या भागातून मुंबईत जाणाऱ्यांना रोजच जनावरांप्रमाणे कोंबलेल्या गाडीतून प्रवास करावा लागतो. त्यात काही जण अंबरनाथहून मागे येतात आणि मग मुंबईकडचा प्रवास सुरू करतात. 

काही जण  तर थेट वांगणी कारशेडमधून बसून येतात. यामुळे ज्या स्टेशनवरून गाडी सुटते, तेथेही प्रवाशांना बसायला जागा मिळत नाही. मग काय रोजची भांडणे ठरलेली. त्यात कधी हाणामारीही होते. कर्जत, खोपोलीहून येणाऱ्या लोकल गर्दीने भरून येतात. बदलापूर-सीएसएमटी हे अंतर जलद लोकलने १ तास २५ मिनिटांचे आहे. त्यातच दोन गाड्यांमध्ये कधी २० मिनिटे तर कधी ४० मिनिटांचे अंतर असते. त्यामुळे समोर आलेली गाडी सोडताही येत नाही. त्यामुळे गाडीत चढण्याची आणि जागा पकडण्यासाठी प्रवाशांना रोज तारेवरची कसरत करावी लागते. 

कल्याणनंतर लोकल कमी कल्याणपासून पुढे कर्जत-खोपोलीपर्यंत गाड्यांची संख्या कमी-कमी होत जाते. त्यातही खोपोली-कर्जतची परिस्थिती आणखी बिकट. त्यामुळे बदलापूरच्या प्रवाशांनी आमच्या गाडीत चढू नये असे कर्जत-खोपोलीच्या प्रवाशांकडून सांगितले जाते. तर बदलापूरचे प्रवासीही कल्याण-डोंबिवलीकरांनी आमच्या गाडीत येऊ नये, असे म्हणताना दिसून येतात. त्यामुळे रोज यावरून प्रवाशांमध्ये वाद होत असतो.

टॅग्स :मुंबईरेल्वे