नाटकांना 'हाऊसफुल्ल'चे बोर्ड लागणारच

By ऑनलाइन लोकमत | Published: December 9, 2020 03:00 AM2020-12-09T03:00:45+5:302020-12-09T03:01:08+5:30

Marathi Natak : नाट्यसृष्टी आता 'अनलॉक' होण्याच्या मार्गावर असतानाच यापुढे मराठी रंगभूमीचे चित्र नक्की कसे असेल, अशी चर्चा नाट्यवर्तुळात सुरु आहे. या पार्श्वभूमीवर विनय आपटे प्रतिष्ठानने, जागतिक मराठी नाट्यधर्मी निर्माता संघाच्या सहयोगाने 'कोविड'नंतरची मराठी रंगभूमी, या विषयावर निमंत्रितांसाठी एक परिसंवाद आयोजित केला होता.

Plays will have a 'Housefull' board | नाटकांना 'हाऊसफुल्ल'चे बोर्ड लागणारच

नाटकांना 'हाऊसफुल्ल'चे बोर्ड लागणारच

Next

- राज चिंचणकर
 
मुंबई  - नाट्यसृष्टी आता 'अनलॉक' होण्याच्या मार्गावर असतानाच यापुढे मराठी रंगभूमीचे चित्र नक्की कसे असेल, अशी चर्चा नाट्यवर्तुळात सुरु आहे. या पार्श्वभूमीवर विनय आपटे प्रतिष्ठानने, जागतिक मराठी नाट्यधर्मी निर्माता संघाच्या सहयोगाने 'कोविड'नंतरची मराठी रंगभूमी, या विषयावर निमंत्रितांसाठी एक परिसंवाद आयोजित केला होता. यात विजय केंकरे, श्रीरंग गोडबोले, वंदना गुप्ते, सुनील बर्वे, प्राजक्त देशमुख, अभिजीत झुंझारराव आदी रंगकर्मी सहभागी झाले होते. एकूणच, कोविडमुळे रंगभूमीवर निर्माण झालेल्या 'पॉज'नंतर मराठी नाटकांना 'हाऊसफुल्ल'चे बोर्ड लागतील, असा आशावादी सूर या परिसंवादातून उमटला... 

परिसंवादात ज्येष्ठ अभिनेत्री वंदना गुप्ते यांनी नाट्यसृष्टीबद्दल बोलताना, मराठी माणसाचे नाटकावर खूप प्रेम आहे आणि मराठी माणूस नाटकांकडे पुन्हा वळणारच याची खात्री असल्याचे स्पष्ट केले. मराठी नाट्यसृष्टीवर अनेकदा विविध प्रकारच्या लाटा येऊन आदळल्या आहेत. पण या सगळ्यातून सावरत मराठी नाटक ताठ मानेने उभे आहे आणि यापुढेही उभे राहील. रंगभूमी उज्ज्वलच राहणार आहे आणि आता नाटक सुरू झाले की हाऊसफुल्लचे बोर्ड लागणारच आहेत, असे ठाम मत वंदना गुप्ते यांनी यावेळी नोंदवले.    

एकूण गणित पाहता, जर नाटकाला २०० माणसे येणार असतील, तर मला ८०० रुपयांचे तिकीटच ठेवावे लागेल. कारण आपण हा व्यवसाय म्हणून करत आहोत; त्यामुळे इतरांकडे प्रत्येक वेळी किती काय मागत राहायचे याचाही आपल्याला विचार करावा लागेल, अशी भूमिका सुनील बर्वे यांनी यावेळी मांडली.   

मराठी नाटकाचे तिकीट दोन हजार रुपये कधीच व्हायला हवे होते; कारण जर नाटकांवर लोकांचे प्रेम असेल, तर लोक येणारच. अजून एक मुद्दा म्हणजे चार-पाच निर्मात्यांनी एकत्र येऊन नाटक करावे, त्याचा परिणाम चांगला होऊ शकेल. प्रशांत दामले यांनी पुढाकार घेऊन आता नाटक सुरू केले आहे आणि त्यातून नाटकाला लोक येणारच याची खात्री पटू लागली आहे, असे मनोगत विजय केंकरे यांनी व्यक्त केले. 

कोरोनामुळे एक 'पॉज' झालाच आहे तर त्यातून काही नवीन फॉर्म्युला आपण शोधून काढला पाहिजे. चांगला आशय घेऊन 'वर्ल्डक्लास' थिएटर आपण करायला हवे. कोविडमुळे समाजाची जी मानसिक पडझड झाली आहे, ती नाटक कशी उचलून धरेल हे पाहायला हवे. तसेच या स्थितीत लोक नाटकाला किती प्राधान्य देतात हेही पाहायला हवे, असे मत श्रीरंग गोडबोले यांनी मांडले. प्राजक्त देशमुख व अभिजीत झुंजारराव यांनी युवावर्गाच्या दृष्टिकोनातून नाट्यसृष्टीविषयी भूमिका मांडली. भरत दाभोळकर यांनी इतर भाषिक रंगभूमीवर सादर होणाऱ्या नाटकांचे संदर्भ देत, मराठी नाटकांसाठी त्यापद्धतीने काम करावे अशी अपेक्षा व्यक्त केली. 

Web Title: Plays will have a 'Housefull' board

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.