नाट्यनिर्माते गोविंद चव्हाण यांचे निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2020 02:59 AM2020-07-14T02:59:28+5:302020-07-14T02:59:45+5:30
बोरीवलीतील खासगी रुग्णालयात रविवारी त्यांना दाखल केले होते. सोमवारी उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. ‘हिमालयाची सावली’ हे त्यांचे नाटक सध्या रंगभूमीवर सुरू होते.
मुंबई : ‘कथा’, ‘यू टर्न’, ‘हिमालयाची सावली’ अशा लोकप्रिय नाटकांची निर्मिती केलेले नाट्यनिर्माते व अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या बोरीवली शाखेचे विद्यमान अध्यक्ष गोविंद चव्हाण यांचे सोमवारी सकाळी ब्रेन हॅमरेजने निधन झाले. ते ५३ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा व मुलगी असा परिवार आहे.
बोरीवलीतील खासगी रुग्णालयात रविवारी त्यांना दाखल केले होते. सोमवारी उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. ‘हिमालयाची सावली’ हे त्यांचे नाटक सध्या रंगभूमीवर सुरू होते. कोरोनामुळे त्याचे प्रयोग थांबले होते. त्यांची निर्मिती असलेले ‘यू टर्न’ हे नाटक प्रचंड गाजले. त्यानंतर त्यांनी या नाटकाच्या ‘यू टर्न २’ अशा दुसऱ्या भागाचीही निर्मिती केली. हे नाटकही तितकेच गाजले. ‘मदर्स डे’, ‘जाऊ दे ना भाई’, ‘टाइम प्लीज’, ‘चॉइस इज युवर्स’, ‘दुधावरची साय’, ‘वन रूम किचन’ अशा यशस्वी नाटकांची त्यांनी निर्मिती केली. ‘यू टर्न’ या नाटकाने त्यांना तसेच ‘सुप्रिया प्रॉडक्शन्स’ या त्यांच्या नाट्यसंस्थेला खरी ओळख मिळवून दिली. ‘आम्ही बोलतो मराठी’ या चित्रपटाच्या निर्मितीतही त्यांचा सहभाग होता.
महाराष्ट्रातील बोलीभाषा रंगभूमीवर एकत्र याव्यात, म्हणून त्यांनी काही वर्षे ‘बोलीभाषा एकांकिका स्पर्धा’ आयोजित केली होती. यामुळे त्यांच्यातील आगळा पैलू समोर आला. त्यांच्या निधनाने मराठी रंगभूमीवर लोकप्रिय नाटके देणारा निर्माता हरपल्याची भावना नाट्यसृष्टीत व्यक्त होत आहे.