- चेतन ननावरेयंदाच्या गणेशोत्सवात प्लॅस्टिकबंदी, डिजिटल इंडिया आणि पर्यावरण संवर्धनाविषयी जनजागृती या विषयावर बहुतेक मंडळांनी देखावे व चलचित्रांतून प्रकाश टाकत समाजसेवेचा घेतला वसा जपण्याचा प्रयत्न केला आहे.गिरणगावातील भायखळा परिसरातील दूर्वांकुर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने यंदाच्या देखाव्यात प्लॅस्टिकचे दुष्परिणाम व त्याला पर्यायी वस्तूंची माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. तर शिवडी मध्य विभाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ अर्थात शिवडीचा राजा मंडळाने प्लॅस्टिकमुळे पर्यावरणाची होणारी हानी दाखविण्याचा प्रयत्न केला आहे.प्लॅस्टिकबंदीसोबतच पर्यावरण वारीचा अनोखा देखावा राणीबागचा विघ्नहर्ता म्हणून प्रसिद्ध असलेल्या भायखळ्यातील मंडळाने उभा केला आहे. या देखाव्यात शहरातून नामशेष होणाऱ्या वृक्षांवर भाष्य करण्यात आले आहे. विशेषत: शहरातील इमारतींच्या कमीत कमी मोकळ्या जागेत व गच्चीवर कशा प्रकारे वृक्ष लागवड करून संगोपन करता येईल, यावर प्रकाश टाकला आहे.मुंबई महापालिकेच्या सार्वजनिक गणेशोत्सव स्पर्धेत छाप सोडणाºया राणीबागच्या राजा मंडळाने यंदा ‘फकीर’ विषयावर चलचित्र साकारले आहे. साईबाबांच्या समाधीच्या शताब्दी महोत्सवाचे निमित्त साधत त्यांच्या कार्यावर प्रकाश टाकला आहे. महत्त्वाची बाब म्हणजे फकीर बनून समाजप्रबोधन करणाºया साईबाबांची महती सांगताना मंडळाने भोंदूबाबांनाही चिमटा काढला आहे. लोकांच्या धार्मिकतेचा आणि श्रद्धेचा गैरफायदा घेणाºयांना चपराक लगावण्यासाठी हा देखावा साकारल्याचे मंडळाकडून समजते.शासनाने सुरू केलेल्या डिजिटल इंडियाचे फायदे सांगणारा देखावाही मुंबईकरांना पाहता येणार आहे. परळ गावातील गं. द. आंबेकर मार्ग (काळेवाडी) सार्वजनिक उत्सव मंडळ अर्थात काळेवाडीचा विघ्नहर्ताने हा विडा उचलला आहे. डिजिटल व्यवहारांचे फायदे आणि त्यातून होणारी देशाची प्रगती याबाबतची माहिती देखाव्यातून देण्यात येणार आहे.
देखाव्यांवर प्लॅस्टिकबंदी, डिजिटल इंडियाची छाप
By ऑनलाइन लोकमत | Published: September 09, 2018 4:59 AM