Join us

‘सत्यमेव जयते’ विरुद्धची याचिका फेटाळली

By admin | Published: June 22, 2016 3:57 AM

बॉलीवूड अभिनेता आमिर खान आणि स्टार टी. व्ही. वर प्रदर्शित करण्यात आलेल्या सत्यमेव जयते या कार्यक्रमात ‘सत्यमेव जयते’ या शब्दावर आक्षेप घेणारी जनहित याचिका उच्च न्यायालयाने मंगळवारी फेटाळली.

मुंबई : बॉलीवूड अभिनेता आमिर खान आणि स्टार टी. व्ही. वर प्रदर्शित करण्यात आलेल्या सत्यमेव जयते या कार्यक्रमात ‘सत्यमेव जयते’ या शब्दावर आक्षेप घेणारी जनहित याचिका उच्च न्यायालयाने मंगळवारी फेटाळली. ‘स्टेट एमब्लेम आॅफ इंडिया (प्रोहिबेशन अ‍ॅण्ड इम्प्रापर युझ)अ‍ॅक्ट आणि स्टेट एमब्लेम आॅफ इंडिया (रेग्यलेशन आॅफ युझ) अंतर्गत राजमुद्रा, अशोकचक्र आणि ‘सत्यमेव जयते’ स्वतंत्रपणे वापरले जाऊ शकत नाही. यांचा वापर एकत्रितपणे करणे बंधनकारक आहे. अन्यथा देशाचा अवमान करण्यासारखे आहे. सत्यमेव जयते या कार्यक्रमात केवळ ‘ सत्यमेव जयते’ चा वापर करण्यात आला आहे. राजमुद्रा आणि अशोकचक्र यांचा वापर केलेला नाही. त्यामुळे संबंधितांवर कारवाई करण्यात यावी,’ अशी मागणी याचिकाकर्ते मनोरंजन राीय यांनी केली होती. या याचिकेवरील सुनावणी न्या. अभय ओक व न्या. अमजद सय्यद यांच्या खंडपीठापुढे होती.केंद्र सरकारने केवळ ‘सत्यमेव जयते’ वापरणे, हा कायद्याने गुन्हा ठरत नाही, अशी भूमिका उच्च न्यायालयात घेतली. ‘केवळ ‘सत्यमेव जयते’ लोगो वापरल्याने कायद्यातील कलम ३, ४ अंतर्गत गुन्हा होत नाही,’ असे म्हणत खंडपीठाने ही याचिका फेटाळली. (प्रतिनिधी)