मुंबई : पोलीस दलातील अधिकारी आणि कर्मचारी हे दैनंदिन कर्तव्यामध्ये नेहमी व्यस्त असतात, त्यामुळे त्यांना त्यांच्या कुटुंबीयांसोबत वेळ देता येत नाही. तसेच त्यांना सण आणि घरातील आनंदाचे कार्यक्रमाला उपस्थित राहता येत नाही. त्यामुळे अनेकदा त्यांच्यात तणाव निर्माण होऊन कामकाजावर परिणाम होऊ शकतो. पोलीस दलातील तेजस्वी अधिकारी म्हणून ओळख असलेल्या सोलापूर ग्रामीणच्या पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी पोलीस दलासाठी महत्त्वाचा निर्णय घेतला होता. सातपुते यांच्या निर्णयाचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी स्वागत करत कौतुक केलंय.
पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी पोलीसांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना सुट्टी देण्याचा निर्णय घेतला आहे. प्रत्येक पोलिस अधिकारी व कर्मचारी यांना किमान त्यांचा वाढदिवस त्यांचे कुटुंबीयासमवेत साजरा करता यावा, यासाठी त्यांना एकदिवस निश्चित सुट्टी देण्याचा निर्णय पोलीस अधीक्षकांनी घेतला. तसेच त्यांना वाढदिवसाचे शुभेच्छापत्रही देण्यात येणार आहे. या निर्णयामुळे कामकाज तणावरहीत होईल आणि पोलिसांना त्यांच्या कुटुंबीयांसोबत एक आनंदाने दिवस साजरा करता येईल, असे सातपुते यांचे मत आहे. या निर्णयामुळे पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांचे कौतुक होत आहे. विशेष म्हणजे गृहमंत्री अनिल देशमुख यांनीही एसपी तेजस्वी सातपुते यांचे कौतुक केलंय.
अनिल देशमुख यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन तेजस्वी सातपुते यांचा निर्णय कौतुकास्पद असल्याचं म्हटलंय. ''तेजस्वी सातपुते आपण पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांना वाढदिवसानिमित्त सुट्टी देण्याचा घेतलेला हा निर्णय कौतुकास्पद आहे. या निर्णयामुळे पोलीस आपला खास दिवस कुटुंबीयांसोबत साजरा करू शकतील. यामुळे पोलीस तणावमुक्त होऊन नव्या जोमाने व प्रचंड उत्साहाने काम करतील, याची मला खात्री आहे.'', असे ट्विट अनिल देशमुख यांनी केलंय. देशमुख यांच्या ट्विटला रिप्लाय करत, तेजस्वी सातपुते यांनी गृहमंत्र्यांचे आभार मानले आहेत. तसेच, आपल्या तसेच, आपले कौतुकाचे शब्द आम्हाला प्रेरणा देतात, असेही सातपुते यांनी म्हटलंय.