राज्यात सर्वत्र सुखद गुलाबी शिरशिरी!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2019 06:25 AM2019-11-16T06:25:02+5:302019-11-16T06:25:10+5:30
मान्सूनसह अवकाळी पावसाने झोडपून काढलेल्या आणि ‘ऑक्टोबर हीट’ने पाठ फिरवल्यानंतर राज्यात अखेर थंडी अवतरली आहे.
मुंबई : मान्सूनसह अवकाळी पावसाने झोडपून काढलेल्या आणि ‘ऑक्टोबर हीट’ने पाठ फिरवल्यानंतर राज्यात अखेर थंडी अवतरली आहे. भारतीय हवामान शास्त्र विभागाच्या म्हणण्यानुसार, १५ नोव्हेंबरला राज्यभरात सर्वत्र गारठ्याची नोंद झाली असून, ठिकठिकाणचे किमान तापमान १५ अंशाच्या आसपास नोंदविण्यात आले आहे.
विशेषत: समुद्र काठावरच्या शहरांमधील सकाळ आल्हाददायक असून, उतरोत्तर यात वाढच होत राहणार आहे. मुंबईत अद्यापही म्हणावा तसा गारठा नाही. मुंबईचे किमान तापमान २४ अंशाच्या आसपास नोंदविण्यात येत असून, किमान तापमान १५ अंशाच्या खाली उतरल्यानंतर मुंबईत थंड वारे वाहतील.
भारतीय हवामान शास्त्र विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी राज्यात सर्वांत कमी तापमान नागपूर येथे १४.५ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले आहे. विदर्भाच्या काही भागांत किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित घट झाली आहे. मध्य महाराष्ट्र व मराठवाड्याच्या काही भागात किंचित वाढ झाली आहे. राज्याच्या उर्वरित भागांत तापमान सरासरीच्या जवळपास नोंदविण्यात आले आहे.
>उत्तर भारतात थंडी दाखल झाल्यानंतर हे शीत वारे दक्षिण भारताकडे म्हणजेच महाराष्ट्राकडे वाहू लागतात. मात्र, अद्याप उत्तर भारतात विशेषत: दिल्ली परिसरात प्रदूषणाने कहर केला आहे. परिणामी, तेथील वातावरणही प्रदूषित असल्याने मुंबईसह महाराष्ट्रवासीयांना गुलाबी थंडी अनुभवण्यासाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे.
>शहरे कमाल किमान
मुंबई ३४ २४
नाशिक २९.२ १६.२
जळगाव २९.८ १७
अहमदनगर २९.६ १५
पुणे २८.७ १८.१
सांगली २९.५ १९.५
औरंगाबाद २८.३ १४.८
नागपूर ३०.१ १४.५
(तापमान : अंश सेल्सिअस)