Join us

पॉर्न ओके प्लीज : लैंगिक साहित्यावर खुलेपणाने चर्चा करणारा 'ऐसी अक्षरे'चा विशेषांक

By admin | Published: May 31, 2016 3:51 PM

'ऐसी अक्षरे' या प्रसिद्ध ऑनलाइन मॅगझिनच्या माध्यमातून'पॉर्न ओके प्लीज' या विशेषांकात लैंगिकता, पॉर्नविश्व यावर भाष्य करण्यात आले आहे.

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ३१ - अनेक विद्वान साहित्यिकांचा वारसा लाभलेल्या आपल्या देशात साहित्याचे रसिकही अनेक आहेत, मात्र जेव्हा लैंगिक साहित्याचा विषय निघतो वा त्यावर चर्चा करण्याची वेळ येते तेव्हा मात्र हा फक्त 'आंबटशौकिनां'चा मामला असल्याची टीका केली जाते. मात्र आताच्या युगातील नागरिक या विषयाकडे सजग व खुलेपणाने पाहताना दिसत असून त्यावर चर्चा करतानाही दिसतात. याच मुद्याच्या पार्श्वभूमीवर 'ऐसी अक्षरे' या प्रसिद्ध ऑनलाइन मॅगझिनच्या माध्यमातून लैंगिकता, पॉर्नविश्व यावर भाष्य करण्यात आले आहे. 'पॉर्न ओके प्लीज' या शीर्षकाखालील विशेषांकात २९ मेपासून ते ५ जूनपर्यंत टप्प्याटप्प्याने या विषयावरील साहित्य प्रकाशित करण्यात येत आहे. 
या अंकातील माहितीपर लेखांमध्ये मराठी नाटकातील अश्लीलता, पॉर्नबद्दल कायदा काय सांगतो?, पॉर्न बघण्याबद्दल लोकांची मतंमतांतरं, त्याबद्दल घेण्यात आलेला सर्व्हे, भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास अशा अनेक मुद्यांचा समावेश करण्यात आला आहे. 
मुंबईस्थित मेघना भुस्कुटे यांनी या विशेषंकाच्या संपादनात महत्वपूर्ण भूमिका बजावली आहे. 'पॉर्न ओके प्लीज' या विशेषांकाच्या संपादनादरम्यानचे त्यांचे अनुभव सांगणारा विशेष लेख वाचा येत्या ५ जूनच्या 'मंथन'मध्ये....
तत्पूर्वी या विशेषांकातील एका लेखाचा काही भाग वाचकांसाठी येथे देत आहोत. 
 
पोर्नोग्राफी आणि सिनेमॅटॉग्राफी
- लक्ष्मीकांत बोंगाळे
 
पॉर्नोग्राफी आणि त्या सिनेप्रकाराची उत्क्रांती दुसऱ्या कुठल्याही सिनेप्रकारापेक्षा खूप खूप वेगळी आहे. सिनेमा म्हणून पॉर्नकडे बघताना त्याच्या भौतिक, आर्थिक, सामाजिक आणि तांत्रिक उत्क्रांतीच्या टप्प्यांकडे बघणं हा अतिशय रंजक अनुभव आहे. मुळातच हा विषय तसा ‘बांधीव-भरीव’ असा आहे. त्याला एकसुरी असण्याची मर्यादा असतानाही, पॉर्नोग्राफीनं आपलं असं जे साम्राज्य उभं केलंय, ते अत्यंत आकर्षक आणि भव्य आहे. 
 
ऍंडी वॉरहॉलचा ‘ब्लू मूव्ही’ - पहिला पॉर्नपट?
 
खऱ्या घटना आणि त्यांचं चित्रीकरण हे वेगवेगळं असतं, हे सगळ्यांनाच माहिती असतं. पण खरोखरचं मैथुन आणि कॅमेऱ्यात दिसणारं मैथुन, या दोन्हींमध्ये हे वेगळेपणाचं प्रमाण नाजूक आहे. खऱ्या आयुष्यात मैथुन करताना असणारं पायांतलं अंतर चित्रीकरण करताना फारसं बदलत नाही; पण मग अवयवांवर पुरेसा उजेड पडत नाही. तो तर चित्रीकरणासाठी आवश्यक असतो. मग काय केल्यानं अवयवांवर उजेड चांगला पडेल, हे आणि तत्सम बारकावे पॉर्नसाठी महत्त्वाचे ठरतात. काळानुरूप छायालेखक, दिग्दर्शक, तंत्रज्ञ अशा अनेकांनी, अनेक तर्‍हांनी ह्या तंत्रज्ञानात आपापल्या सौंदर्यमूल्यांची भर घातली आहे. आज पॉर्न फिल्म्स्‌चं छायांकन हे मॉडेलिंग फोटोग्राफीच्या बरोबरीनं होतं. 
 
एके काळी पॉर्न हे काल्पनिक कथेत गुंफलेलं (फिक्शन-बेस्ड) असायचं, पण आज त्याला माहितीपटाच्या (डॉक्युमेंटरी) अंगानं हाताळलं जातं. म्हणूनच आजच्या धंदेवाईक आणि हौशी, या दोन्ही प्रकारांच्या पॉर्न फिल्म्समध्ये हातात धरून वापरण्याचा भास देणारा कॅमेरा (हॅंडहेल्ड कॅमेरा) हा अतिशय महत्त्वाचा घटक आहे. सतत हलणारी चपळ शरीरं आणि ती टिपणारा तसाच चंचल-चपळ कॅमेरा, असं त्या चित्रीकरणाचं स्वरूप आहे. काही ‘बॉन्डेज’ आणि ‘सॅडिस्ट’ पॉर्न फिल्म्स्‍ हे या सर्वसाधारण नियमाला असलेले नगण्य अपवाद. कारण, पॉर्न हे ‘जिवंत’ असलं पाहिजे, अशी आज अपेक्षा असते. ती पूर्ण व्हावी, म्हणून बरेच चांगले स्टुडिओज्‌ पॉर्नपटांच्या मागे-पुढे जोडण्यासाठी त्यात काम करणार्‍या कलाकारांच्या मुलाखती घेतात. ही अतिरंजित सुंदर दिसणारी आणि मैथुनात तास-तासभर दम टिकवणारी माणसं काय बोलतात, त्यांच्या आयुष्यात काय घडत असतं, हे जाणून घेण्यात प्रेक्षकांना रस असतो. पॉर्न तारकांना आता थोडं फिल्मी स्टारडमही आलेलं आहे. बघणाऱ्यांना जाच नको म्हणून पूर्वी आवाज नाहीसे करत असत. एखादं चक्री कृत्रिम संगीत (Music in loop) जोडून शरीरांची दृश्यं दाखवत असत. ते हळूहळू बदलत जाऊन, अत्यंत स्वच्छ चित्रभाषेसकट आणि आवाजांसह, मैथुनाची प्रक्रिया जिवंत करणारे  पॉर्नपट आता निर्माण केले जातात. 
 
पॉर्न हे एका प्रकारचं दस्तावेजीकरण (डॉक्युमेंटेशन) असलं, तरी तो सिनेमासुद्धा आहे. त्यात नाट्य आहे, अतिशयोक्ती आहे, सौंदर्याच्या अतिरंजित कल्पना आहेत, पौरुष आणि स्त्रीत्वाच्या टोकाच्या कल्पना आहेत. 
 
प्रेक्षकांच्या दृष्टीने बघता डिजिटल क्रांतीतून पहिल्यांदा आल्या त्या व्ही. सी. आर. टेप्स, मग व्ही. एच. एस. त्यानंतर अनेक वर्षांच्या थांब्यांनंतर आल्या सीडीज्‍ आणि डीव्हीडीज्‍. या प्रत्येक टप्प्यागणिक पॉर्न बघणं अधिकाधिक सोपं होत गेलं. एकान्ताचा आणि पॉर्नचा संबंध अतूट असल्यामुळं जितकी अधिकाधिक वैयक्तिक आणि प्रगत तंत्रसाधनं उपलब्ध होत गेली, तितकी पॉर्नची मागणी वाढत गेली. सीडीज्‍चा जमाना १९९४ सालानंतरचा. त्या तिसर्‍या जगातल्या विकसनशील देशांतल्या लोकांपर्यंत नुकत्या कुठे पोचत होत्या, तितक्यातच इंटरनेट आलं. नवीन सहस्रकाच्या पहिल्या पाच वर्षांतच जगात पॉर्नचं जंगल माजलं. हजारो वेबसाईट्स आल्या-गेल्या; व्हिडिओज्‍, फोटो, कथा असं सगळं एकदम सामोरं आलं. चॅटरूम्स आल्या. माणसं स्वत:ला नि:संकोचपणे आणि वरचेवर कॅमेऱ्यातून दाखवायला लागली. 
 
इंटरनेटनं जन्माला घातलेला एक महत्त्वाचा पॉर्नप्रकार म्हणजे हौशी (अॅमॅच्युअर किंवा पर्सनल) पॉर्न. तेच आज इंटरनेटवर सगळ्यात जास्त प्रमाणात उपलब्ध आहे. आज जगभरातले अनेक लोक स्वतःचं लैंगिक दस्तावेजीकरण करायला तयार आहेत - किंबहुना उत्सुक आहेत. आता कॅरिअर्स आहेत, बघणारी माणसं आहेत आणि यातूनच हा एक संपूर्ण उद्योग जगभर प्रसृत झालेला आहे.