मुंबई गौड सारस्वत ब्राह्मण सभा, मुलुंड या संस्थेने मुंबई फोरम ऑफ आर्टिस्टच्या सहकार्याने पं.भीमसेन जोशी स्मृती महोत्सवाचे आयोजन केले आहे. या महोत्सवात ज्येष्ठ गायक पं.राजा काळे यांना पं.भीमसेन जोशी स्मृती पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. त्यांच्यासह संगीत क्षेत्रातील विविध मान्यवर कलाकारांचा या महोत्सवात सहभाग आहे.
या महोत्सवात ज्येष्ठ गायक पं. राजा काळे, गिटारवादक अभिषेक प्रभू, तबलावादक मंदार पुराणिक व विघ्नेश कामत, हार्मोनियमवादक अनंत जोशी, पखवाजवादक हनुमंत रावडे, मंजिरावादक अनिल पै आदींचा सहभाग आहे. २१ फेब्रुवारी रोजी संध्याकाळी साडेपाच वाजता मुलुंडच्या महाराष्ट्र सेवा संघाच्या सभागृहात हा कार्यक्रम रंगणार आहे. कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर या महोत्सवाचे ऑनलाइन पद्धतीने प्रक्षेपण करण्यात येणार आहे.
गोलफादेवीचा उत्सव साजरा
मुंबई वरळी कोळीवाड्याचे आराध्य दैवत असलेल्या गोलफादेवीचा उत्सव शाकंभरी पौर्णिमेच्या मुहूर्तावर पार पडला. यंदा जत्रोत्सवाला परवानगी नसल्याने या दिवशी गोलफादेवीच्या परिसरात जत्रा भरली नाही. मात्र, प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करून गोलफादेवीचे मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले ठेवण्यात आले होते. वरळी गावात पसरलेल्या कोळीवाड्यात एका टेकडीवर गोलफादेवीचे पुरातन मंदिर आहे. या मंदिरात गोलफादेवीसह साकबादेवी व हरबादेवी यांचेही स्थान आहे. भाविकांनी या दिवशी या देवींचे दर्शन घेतले. मात्र, यंदा जत्रा नसल्याने हा परिसर सुनासुना राहिला.
मुंबई वाचनालयाने जपली परंपरा....
माहीम सार्वजनिक वाचनालयाच्या अभ्यासिकेतील विद्यार्थी किंवा वाचनालयाचा कर्मचारी वर्ग यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्याची परंपरा वाचनालयाने यंदाही जपली. प्रजासत्ताक दिनी वाचनालयातील ग्रंथपाल सहायक सानिका पवार यांच्या हस्ते यंदा ध्वजारोहण करण्यात आले. वाचनालयाचे अध्यक्ष अवधूत परळकर, तसेच वाचनालयाचे सभासद आणि माहीम विभागातील काही मान्यवर व्यक्तींची भाषणे हे या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य ठरले. सानिका पवार यांनी यावेळी वाचनालयाचे उपक्रम व सेवा बजावताना आलेल्या आठवणींना उजाळा दिला. वाचनालयाचा हा उपक्रम अतिशय स्तुत्य असल्याच्या प्रतिकिया यावेळी वाचक वर्गाकडून नोंदविण्यात आल्या.
आंतर-महाविद्यालयीन स्पर्धा
मुंबई मेन अगेन्स्ट व्हायलन्स अँड अब्युस (मावा) या संस्थेने ‘युवा अभिव्यक्ती २०२१’ या दोन दिवसीय आंतर-महाविद्यालयीन सांस्कृतिक स्पर्धांचे विनामूल्य आयोजन केले आहे. २० व २१ फेब्रुवारी रोजी ऑनलाइन माध्यमाद्वारे होणाऱ्या या स्पर्धेत ‘विषारी मर्दानगी’ या विषयावर निबंध स्पर्धा, पथनाट्य, घोषवाक्य, समूह गायन, वक्तृत्व, भित्तीचित्र व लघुपट निर्मिती स्पर्धांचे आयोजन आले आहे. समाजात असलेली विषारी मर्दानगी आणि त्यातून होत असलेली हिंसा व अत्याचार थांबवून एक हिंसामुक्त समृद्ध समाज निर्माण होण्याच्या अनुषंगाने युवकांचे कलाविष्कार सादर व्हावेत, या हेतूने या स्पर्धा घेण्यात येणार आहेत. मुंबई विद्यापीठ, एसएनडीटी, तसेच इतर विद्यापीठ व शैक्षणिक संस्थांचे विद्यार्थी या सहभागी होऊ शकतील. स्पर्धेसाठी yuva.abhivyakti123@gmail.com या ईमेलवर संपर्क साधण्याचे आवाहन संस्थेने केले आहे.
‘वडपारंब्या’ प्रकाशित...
मुंबई मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याचे औचित्य साधून लेखिका स्मिता पावसकर यांच्या ‘वडपारंब्या’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. डिंपल पब्लिकेशनने हे पुस्तक प्रकाशित केले आहे. ज्येष्ठ शास्त्रज्ञ रघुनाथ माशेलकर यांच्या हस्ते ऑनलाइन पद्धतीने या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. या पुस्तक प्रकाशनाच्या निमित्ताने, खऱ्या अर्थाने मराठीचा जागर झाला, अशी प्रतिक्रिया प्रकाशक अशोक मुळे यांनी दिली. =============================================================================================================================