Join us

आमच्या कामाचा दाम द्या!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2016 6:04 AM

चलनातून पाचशे आणि एक हजार रुपयांच्या नोटा बंद केल्याने सर्वसामान्यांचे प्रचंड हाल झाले आहेत. मात्र सर्वसामान्यांना खर्च करण्यासाठी पुरेसे पैसे उपलब्ध व्हावेत

मुंबई : चलनातून पाचशे आणि एक हजार रुपयांच्या नोटा बंद केल्याने सर्वसामान्यांचे प्रचंड हाल झाले आहेत. मात्र सर्वसामान्यांना खर्च करण्यासाठी पुरेसे पैसे उपलब्ध व्हावेत, म्हणून देशातील बँक कर्मचारी सकाळपासून रात्रीपर्यंत मेहनत करत आहेत. कार्यकक्षेबाहेर जाऊन काम करणाऱ्या बँक कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना त्यांच्या कामाचा मोबदला वेतनातून द्यावा, अशी मागणी बँक कर्मचाऱ्यांचे नेते विश्वास उटगी यांनी केली आहे.उटगी यांनी सांगितले की, शासनाने कर्मचाऱ्यांसोबत केलेल्या करारात अधिकच्या कामासाठी अधिक मोबदला देण्याची तरतूद आहे. मात्र बँक कर्मचाऱ्यांकडून काम करून घेतल्यानंतर तसा मोबदला त्यांना दिला जात नाही. काळ्या पैशावर सरकारने केलेल्या सर्जिकल स्ट्राइकनंतर लोकांमध्ये पैशांचा तुटवडा निर्माण झाला आहे. पैशांअभावी समाजात असंतोष माजू नये, म्हणून बँक कर्मचारी सकाळपासून सायंकाळी उशिरापर्यंत ग्राहकांना सेवा देत आहेत. त्यासाठी कर्मचाऱ्यांना पहाटेपासून मध्यरात्रीपर्यंत काम करावे लागत आहे. परिस्थितीत नियंत्रणात आल्यानंतर सरकारने त्याची जाण ठेवावी, अशी अपेक्षा उटगी यांनी व्यक्त केली.मुंबईतील बहुतेक बँकांबाहेर वादावादीचे प्रसंग घडू लागल्याने शुक्रवारी पोलीस बंदोबस्त तैनात केला होता. मात्र बँक आॅफ इंडियाच्या लालबाग शाखेबाहेर पोलिसांची गरज भासली नाही. याबाबत बँकेचे वरिष्ठ प्रबंधक महिंद सोमकुंवर म्हणाले की, मंगळवारी चलन बंदची घोषणा झाल्यानंतर बुधवारी बँकेच्या सहकाऱ्यांसोबत पुढील नियोजन केले होते. नियोजित वेळेनुसार बँक सकाळी ९ ते दुपारी अडीच वाजेदरम्यान सुरू असते. मात्र ग्राहकांना अधिकाधिक सेवा देण्यासाठी गुरुवारी सकाळी साडेआठ वाजल्यापासून सायंकाळी पाच वाजेपर्यंत पैसे देण्याचे काम सुरू होते. (प्रतिनिधी) हॉटेलमध्ये सुट्या पैशांवरून हाणामारीहॉटेलमध्ये जेवणासाठी गेलेल्या तरुणांकडे सुटे पैसे नसल्याच्या वादातून हॉटेल मॅनेजर, कॅशियर आणि वेटर्सनी तीन तरुणांना मारहाण केल्याची घटना गुरुवारी रात्री घडली. माहीम पोलिसांनी आरोपींना बेड्या ठोकल्या. माहीम परिसरातील हॉटेल गंगाविहारमध्ये तीन तरुण गुरुवारी रात्री जेवणासाठी गेले होते. जेवणाचे बिल ५८० रुपये झाल्याने तरुणाने पाचशे रुपयांची एक आणि शंभर रुपयांची एक नोट वेटरकडे दिली. पाचशेची नोट चालणार नाही असे कॅशियरने बजावले. यातील एकाने क्रेडिट कार्ड कॅशियरकडे दिले. मात्र हॉटेलमधील मशिनच चालत नसल्याचे लक्षात येताच हॉटेल मॅनेजरने हे कार्ड फेकून देत तरुणांशी हुज्जत घालत त्यांना मारहाण केली.मुंबईकरांचे हाल एटीएमचा दिलासा नाहीचचलनातून पाचशे आणि एक हजार रुपयांच्या नोटा बंद केल्याने मंगळवारी मध्यरात्रीपासून सुरू झालेली मुंबईकरांची दैना शुक्रवारीही कायम होती. बँकेसोबत एटीएममधूनही लोकांना पैसे काढता येतील, ही शासनाची घोषणा फोल ठरली. बहुतेक एटीएम शुक्रवारी बंद होते, तर काही प्रमाणात सुरू असलेल्या एटीएममधूनही तांत्रिक बिघाडामुळे सर्वच ग्राहकांना पैसे काढता आले नाही. मुंबई शहरासह उपनगरांत गुरुवारप्रमाणेच शुक्रवारीही बँकांबाहेर लांबच लांब रांगा लागल्या होत्या. बँकेसोबतच अनेक ग्राहकांनी एटीएमबाहेरही रांगा लावल्या होत्या. मात्र काही कारणास्तव बहुतेक एटीएम शुक्रवारी खुली झालीच नाहीत. त्यामुळे नागरिकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला. तर एटीएममधून १०० रुपयांच्या नोटा मिळालेल्या ग्राहकांच्या आनंदाला पारावार उरला नव्हता. सलग तीन दिवसांपासून मुंबईतील बाजारपेठाही थंडावल्या होत्या. सरासरी १० टक्के गिऱ्हाईकही नसल्याने व्यापारी वर्गातून शासनाविरोधात रोष व्यक्त करण्यात आला. बाजारपेठांमधील बहुतेक दुकानदारांनी दुकाने बंद ठेवणेच पसंत केले. त्याचा सर्वाधिक फटका रोजंदारीने काम करणारे पाटीवाले, हातगाडी चालक, हमाल आणि माथाड्यांना सहन करावा लागला. हीच परिस्थिती कायम राहिल्यास उपासमारीची वेळ येईल, अशी माहिती मशीद बंदर येथील हातगाडी चालक बबन पवार यांनी दिली.