मुंबई - जगभरात कोरोना व्हायरसने धुमाकूळ घातला आहे. या कोरोनावर नियंत्रण आणण्यासाठी अनेक देशांमध्ये लॉकडाऊन सुरु आहे. लॉकडाऊनच्या तिसऱ्या टप्प्यात काही प्रमाणात शिथिलता देण्यात आली आहे. तसेच, मुंबईत अडकलेल्या परराज्यातील मजूरांना त्यांच्या गावी पोहोचविण्याचेही सरकारकडून प्रयत्न सुरु आहेत. त्यासाठी, श्रमिक ट्रेन सुरु करण्यात आली आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यात अडकलेल्या विद्यार्थी मजूर आणि कामगारांनाही त्यांच्या मूळगावी पाठविण्यात येत आहे. त्याच पार्श्वभूमीवर अद्यापही विदेशात अडकलेल्या महाराष्ट्रीयन नागरिकांना गावाकडे आणण्यासाठी राज्य सरकारने पुढाकार घेतला आहे.
लॉकडाऊनच्या कालावधीत विदेशात अनेक भारतीय अडकून पडले आहेत. त्यामध्ये महाराष्ट्रातीलही नागरिकांचा समावेश आहे. दोन दिवसांपूर्वीच सिंगापूरमध्ये राहणाऱ्या जवळपास 4800 भारतीयांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. याबाबतची माहिती सिंगापूरमधील भारतीय उच्चायुक्तांनी दिली. सिंगापूरमध्ये काम करणाऱ्या विदेशी नागरिकांसह भारतीय मोठ्या संख्येने डॉरमिट्रीमध्ये राहतात. सिंगापूरमध्ये आतापर्यंत 18205 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर 18 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती सिंगापूरमधील आरोग्य मंत्रालयाने रविवारी दिली आहे. त्यामुळे सर्वच राज्यातील सरकारने याची गंभीर दखल घेत आपल्या राज्यातील नागरिकांच्या घरवापसीसाठी पुढाकार घेतला आहे.
मुख्यमंत्रीउद्धव ठाकरेंकडून विदेशात अडकलेल्या महाराष्ट्रीयन नागरिकांना आवाहन करण्यात आलं आहे. मुख्यमंत्री कार्यालयाच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन एक फॉर्म जारी करण्यात आला आहे. त्यासोबत एक मेसेजही देण्यात आला आहे. तुम्ही महाराष्ट्राचे नागरिक आहात, पण सध्या विदेशात अडकले आहात. तर, खाली देण्यात आलेला फॉर्म भरावा, अशी माझी आपणास विनंती आहे. राज्य सरकारकडून परराष्ट्र मंत्रालयास याबाबतची माहिती देण्यात येईल. तसेच आपल्याला लवकरात लवकर महाराष्ट्रात आणण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे मुख्यमंत्री कार्यालयाच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन म्हटले आहे.
शहीद कर्नल आशुतोष शर्मा यांना भावपूर्ण निरोप; आईसाठी लिहिलेली कविता वाचून डोळे पाणावतील!
दरम्यान, सिंगापूरमधील भारतीय उच्चायुक्त जावेद अशरफ यांनी सोमवारी सांगितले. सिंगापूरमध्ये अनपेक्षितरित्या दीर्घ मुक्काम झाल्यामुळे विद्यार्थ्यांसह 3500 हून अधिक भारतीयांनी घरी परतण्यासाठी आणि जेवणाची सोय करावी, या मागणीसाठी उच्च आयोगाकडे नोंदणी केली आहे, असेही जावेद अशरफ यांनी सांगितले. याशिवाय, कोरोनाची लागण झालेल्या 4800 भारतीयांपैकी जवळपास 90 टक्क्यांहून अधिक लोक कामगार आहेत. जे बहुतेक विदेशी कामगारांच्या डॉरमिट्रीमध्ये राहतात, असेही जावेद अशरफ म्हणाले.
BSF चे 67 जवान कोरोना पॉझिटीव्ह, सुट्टीवर गेलेल्या जवानासही लागण
जगभरात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. अमेरिका, स्पेन, इटली या देशांसह जगभरातील देशांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणत असून मृतांचा आकडा सुद्धा जास्त आहे. भारतात सुद्धा कोरोनाग्रस्तांची संखा रोजच वाढत आहे. त्यामुळे कोरोनावर नियंत्रण आणण्यासाठी देशात केंद्र सरकारने तिसऱ्यांदा लॉकडाऊन वाढविण्याचा निर्णय घेतला आहे.