ग्राहक सुरक्षिततेसाठी शपथ
By admin | Published: February 23, 2017 07:12 AM2017-02-23T07:12:23+5:302017-02-23T07:12:23+5:30
धारावी येथील राजीव गांधी क्रीडा संकुलात सुरू असलेल्या युवा प्रशिक्षण शिबिरात
मुंबई : धारावी येथील राजीव गांधी क्रीडा संकुलात सुरू असलेल्या युवा प्रशिक्षण शिबिरात, बुधवारी १५० युवकांनी ग्राहक सुरक्षिततेसाठी शपथ घेतली. त्याचबरोबर युवकांनी ‘सुजाण नागरिक, सज्ञान ग्राहक’ म्हणून असलेले कर्तव्य पार पाडण्याचे वचन, भारतीय ग्राहक मार्गदर्शन सोसायटीच्या व्यवस्थापकीय सदस्या देवीका पुरव यांना दिले.
क्रीडा व युवक सेवा संचालनालयाच्या वतीने, धारावी येथील राजीव गांधी जिल्हा क्रीडा संकुलात निवासी युवा प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. २० फेब्रुवारी रोजी सुरू झालेल्या शिबिरात अॅड. पुरव यांनी शिबिरार्थींशी संवाद साधला. या वेळी जिल्हा क्रीडा अधिकारी सुवर्णा बारटक्के, क्रीडा अधिकारी सुभाष नावंदे उपस्थित होते. पुरव यांनी विविध राज्यांतून आलेल्या युवकांच्या शंकेचे निरसन केले. शिवाय जगातील तरुण देशात युवकांना आपल्या अधिकाराची जाणीव करून द्यावी लागते, याबाबत त्यांनी खेद व्यक्त केला. त्यांनी युवकांना आपल्या हक्काची जाणीव करून देत, सुजाण नागरिक, सज्ञान ग्राहक ाचे कर्तव्य पार पडण्याचे वचन शिबिरार्थीकडून घेतले.
शिबिरात राष्ट्रीय युवा पुरस्कार विजेते सुभाष दळवी यांच्यासह संदेश लेलगे, अश्विनी नायर यांनीदेखील चर्चासत्रांद्वारे शिबिरार्थींशी संवाद साधला. या शिबिरांमुळे व्यासपीठांवर उभे राहून बोलण्याची भीती दूर झाल्याची प्रतिक्रिया ठाण्याच्या ग्रेसी सिंगने दिली, तर शिबिरामुळे ‘टीम वर्क’चे फायदे मिळाल्याचे वृषाली काकडेने सांगितले. शिबिरात झालेल्या सर्व शिबिरार्थींची निवास आणि भोजन व्यवस्था शासनाच्या वतीने करण्यात येते. (प्रतिनिधी)