कोंडीत भावा-बहिणींचे हाल, लोकलचे रविवार वेळापत्रक, रिक्षा, टॅक्सीचालकांकडून लूट
By ऑनलाइन लोकमत | Published: November 4, 2024 09:13 AM2024-11-04T09:13:21+5:302024-11-04T09:13:41+5:30
Diwali Bhau Beej News: मध्य रेल्वेने भाऊबीजेच्या पार्श्वभूमीवर रविवारी मेगाब्लॉक रद्द करत प्रवाशांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला असला, तरी रविवारच्या वेळापत्रकामुळे १५ ते २० टक्के लोकल कमी असल्याने प्रवाशांचे अतोनात हाल झाले. दिवाळी विशेषत: भाऊबीजेसाठी आपल्या नातेवाइकांकडे निघालेल्या नागरिकांची संख्या मोठी होती.
मुंबई - मध्य रेल्वेने भाऊबीजेच्या पार्श्वभूमीवर रविवारी मेगाब्लॉक रद्द करत प्रवाशांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला असला, तरी रविवारच्या वेळापत्रकामुळे १५ ते २० टक्के लोकल कमी असल्याने प्रवाशांचे अतोनात हाल झाले. दिवाळी विशेषत: भाऊबीजेसाठी आपल्या नातेवाइकांकडे निघालेल्या नागरिकांची संख्या मोठी होती. त्यामुळे दिवसभर फलाटांवर प्रवाशांची खच्चून गर्दी पाहायला मिळत होती. काही प्रवाशांनी रस्ते मार्गाने वाहतुकीचा पर्याय निवडला, परंतु काही ठिकाणी झालेली वाहतूककोंडी, तसेच रिक्षा, साधी टॅक्सी, तसेच ॲप आधारित टॅक्सीचालकांकडून झालेल्या जादा भाडेआकारणीमुळे अनेकांच्या खिशाला कात्री लागली. शिवाय प्रवासाचा मनस्ताप झाल्याने प्रवासी त्रस्त झाले होते.
बहीण-भावांच्या नात्यातील गोडवा वाढवणारी भाऊबीज यंदा रविवारी आली होती. शिवाय दिवाळीनिमित्त नातेवाईक, मित्र-मैत्रिणींकडे जाण्यासाठी, तसेच सांगीतिक कार्यक्रम, नाटके, चित्रपट, पर्यटनानिमित्त बाहेर पडलेल्या नागरिकांची संख्या मोठी होती. त्यामुळे सकाळ ते रात्री उशिरापर्यंत विविध स्थानकांसह लोकलमध्ये प्रवाशांची गर्दी होती. लोकल पूर्णत: भरून येत असल्याने त्यात चढता-उतरताना अक्षरश: रेटारेटी होत होती. अनेकांनी दोन ते तीन लोकल सोडून मागून येणाऱ्या लोकलमधून प्रवास करण्याचा प्रयत्न केला. लहान मुले, घरांतील ज्येष्ठांसह बाहेर पडलेल्या कुटुंबीयांचे त्यात मोठे हाल झाले.
अनेकांनी रेल्वे स्थानकांतून काढता पाय घेत टॅक्सी, रिक्षाने प्रवासाचा पर्याय स्वीकारला. मात्र, त्याचा ताणही रस्ते वाहतुकीवर आला. पूर्व-पश्चिम द्रुतगती मार्गासह शहरातील अंतर्गत मार्गांवर वाहतूककोंडी झाल्यामुळे प्रवासी मेटाकुटीला आले होते. दुपारच्या वेळेत उन्हाच्या झळांमुळे प्रवासी घामाघूम झाले होते. त्यामुळे त्यांना प्रवास नकोसा झाला होता.
सणासुदीत नेहमीचे वेळापत्रक हवे
रिक्षा, टॅक्सीचालकांनी नेहमीप्रमाणे जवळचे भाडे घेण्यास नकार दिल्याचे प्रवाशांचे म्हणणे होते. तर, काही ठिकाणी अव्वाच्या सव्वा भाडे उकळण्याचा प्रयत्न केला. तर, ॲप आधारित टॅक्सी सेवांच्या भाड्याचे दर मागणीनुसार वाढत होते.
या टॅक्सीचालकांनीही वाहतूककोंडी झालेल्या मार्गांवरील भाडे नाकारले. त्यामुळे दुसरे वाहन मिळेपर्यंत ताटकळावे लागल्याचे प्रवाशांनी सांगितले. दिवाळीची गर्दी गृहित धरून रेल्वे प्रशासनाने नेहमीप्रमाणे लोकल सेवा सुरू ठेवण्याची गरज अनेकांनी व्यक्त केली.