- लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : पूर्व उपनगरात सुपर स्पेशालिटी रुग्णालयासाठी आरक्षित असलेला ८ हजार २०९ चौरस मीटरचा भूखंड, पालिका अधिकाऱ्यांनी विकासकाच्या घशात घातल्याचा गंभीर आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केला आहे. अधिकारी व सत्ताधारी शिवसेनेच्या नेत्यांची संगनमताने या भूखंडाचे श्रीखंड खाल्ले आहे. त्यामुळे त्यांची चौकशी करावी, अशी मागणी मनसेचे माजी आमदार शिशिर शिंदे यांनी आयुक्त अजय मेहता यांच्याकडे बुधवारी केली.शिंदे यांनी दिलेल्या निवेदनानुसार, मुंबई महापालिकेला ५५० खाटांचे सुपरस्पेशालिटी रुग्णालय बांधून देण्यासाठी, भांडुप पश्चिम येथील विकासकाकडे एकूण १८ हजार ७६५ क्षेत्रफळाचा भूखंड चार वर्षांपूर्वी देण्यात आला. त्यासाठी दीडशे कोटी रुपयांची तरतूदही करण्यात आली. मात्र, प्रशासनाच्या निष्काळजीमुळे हा संपूर्ण भूखंड रुग्णालय न बांधून घेताच, संबंधित विकासकाच्या ताब्यात देण्याची नामुष्की पालिकेने ओढावली आहे. चार वर्षांत साधी वीट रचलेली नाहीगेल्या चार वर्षांत पालिकेने येथे साधी वीटदेखील रचलेली नाही. सत्ताधारी शिवसेना आणि काही भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या संगनमतामुळे सुमारे २०० कोटी रुपयांचा हा भूखंड गमाविण्याची वेळ पालिकेवर आली आहे. त्यामुळे दोन महिन्यांत चौकशी पूर्ण करून, यात दोषी आढळून येणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी व त्यांच्याविरोधात लाचलुचपत विभागाकडे तक्रार करावी, अशी मागणी शिंदे यांनी केली आहे.
सुपरस्पेशालिटी रुग्णालयाचा भूखंड विकासकाच्या घशात, मनसेचा आरोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2017 3:00 AM