मटका किंग सुरेश भगत याची पत्नी आणि मेहुणीच्या हत्येचा कट उधळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2020 04:05 AM2020-12-23T04:05:57+5:302020-12-23T04:05:57+5:30
भगतच्या भावासह पाच जणांना अटक, गुन्हे शाखेची कारवाई मटका किंग सुरेश भगतची पत्नी, मेहुणीच्या हत्येचा कट उधळला भगतच्या भावासह ...
भगतच्या भावासह पाच जणांना अटक, गुन्हे शाखेची कारवाई
मटका किंग सुरेश भगतची पत्नी, मेहुणीच्या हत्येचा कट उधळला
भगतच्या भावासह पाच जणांना अटक
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मटका किंग सुरेश भगत याची पत्नी जया भगत आणि मेहुणीच्या हत्येचा कट उधळण्यास गुन्हे शाखेला यश आले. भगतच्या भावानेच त्याच्या हत्येची सुपारी दिली होती. या प्रकरणी त्याच्यासह पाच जणांना अटक करण्यात आली.
विनोद भगत (६९), मोहम्मद जावेद इस्लामुद्दीन अन्सारी (४१), रामवीर नरेशकुमार शर्मा (३९), मोहम्मद अन्वर शबीर दर्जी (३१), मकसूद कुरेशी (३५) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. आरोपींकड़ून २ गावठी कट्टा, ६ जिवंत काडतुसे, १३ मोबाइल, आधार कार्ड, वाहनचालक परवाना, एटीएम कार्डसह मनी ट्रान्सफरच्या ८ पावत्यांसह सुपारी घेतलेल्या महिलांचे फाेटो जप्त करण्यात आले आहेत.
सुरेश भगत हा मटका किंग म्हणून ओळखला जात होता. त्याची २००८ साली हत्या झाली. एका मोठ्या अपघातात त्याचा मृत्यू झाला होता. मात्र, तपासात अपघात नसून, हत्या असल्याचे स्पष्ट होताच, या प्रकरणी त्याची पत्नी जयासह काही जणांना अटक केली. या प्रकरणी तिला शिक्षाही झाली होती. शिक्षा भोगून बाहेर आली, तेव्हापासून ती घाटकोपर येथे राहते.
उत्तर प्रदेश येथून दोघेजण जयाच्या हत्येसाठी येणार असल्याची माहिती कक्ष ९चे प्रभारी वरिष्ठ पोलीस निरिक्षक नंदकुमार गोपाळे यांना मिळाली. त्यानुसार, पथकाने एकाला अटक केली. त्याच्या चौकशीत परदेशात वास्तव्यास असलेल्या आरोपीने त्याला दोन महिलांच्या हत्येसाठी ६० लाखांची सुपारी दिल्याचे समोर आले. त्या पाठोपाठ उत्तर प्रदेशच्या बिजनोरमधून दोघांना सोमवारी अटक करण्यात आली आहे.
अटक आरोपींच्या चौकशीतून इंग्लड येथे राहण्यास असलेल्या आरोपीने भगतच्या सांगण्यावरून अटक आरोपींना घाटकोपर येथील बहिणीची हत्या करण्याची सुपारी दिली. त्यानुसार, भगतच्या भावाला विनोदला वाळकेश्वर येथून ताब्यात घेत अटक केली. भावाच्या हत्येचा बदला आणि मटका व्यवसायातील वादातून हत्येचा कट आखल्याचे समोर आले आहे.
........................................