मुंबई : आपल्या घराची काही लोकांकडून रेकी केली जात असून, आपण याबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि मुंबईच्या पोलीस आयुक्तांकडे तक्रार करणार आहोत, असे अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी शनिवारी पत्रपरिषदेत सांगितले. आपला अनिल देशमुख करण्याचा डाव आहे, असे ते म्हणाले.माझ्या घराची आणि शाळेची रेकी काही जण करीत आहेत. काही दिवसांपासून हा प्रकार सुरू आहे. त्यांना माझ्याविषयी काही माहिती हवी असेल तर त्यांनी मला येऊन भेटावे. मी सगळी माहिती देईन, असे ते म्हणाले. तसेच, काही फोटो दाखवून त्यांनी ती व्यक्ती भाजपशी संबंधित असल्याचा संशयही व्यक्त केला. मुंबई पोलीस आयुक्त आणि देशाच्या गृहमंत्र्यांना मी पत्र लिहून तक्रार करणार आहे. केंद्रीय यंत्रणांचा वापर करून राज्य सरकारला बदनाम करण्याचे कटकारस्थान होत आहे. अनिल देशमुखांचे जे केले ते माझ्यासोबत करण्याचे घाटत आहे. माझ्या घराची रेकी करणाऱ्या व्यक्तींचे सोशल मीडिया अकाउंट पाहिल्यास त्यांची तार भाजपशी जुळल्याचे दिसून येते, असा आरोपही त्यांनी केला.
दरेकर यांचा टोला : मलिक यांनी आधी काही कृत्ये करून ठेवली असतील. ‘खाई त्याला खवखवे’ अशी त्यांची अवस्था आहे, असा टोला विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी लगावला आहे. आपल्याला कोंडीत पकडले जाण्याच्या भीतीमुळेच ते पाळत ठेवली जात असल्याचे चित्र उभे करीत आहेत. त्यांनी एक आखाडा तयार करून ठेवला आहे. त्या आखाड्यात ते स्वत:च लोळत आहेत. दुसरा कुणी त्यांच्यासोबत कुस्ती खेळायलाही येत नाही, असे दरेकर म्हणाले.