मुंबई - आज मध्यरात्री १२ ते पहाटे २.३० च्या सुमारास अचानक जोरदार वादळी वाऱ्यासह पाऊस सुरू झाला होता. वा-याचा वेग इतका प्रचंड होता की, मालाड पश्चिम मढ येथील तळपशा बंदरात नांगरून ठेवलेल्या २५ ते ३० मासेमारी नौकांचे नांगर दोर तुटले.
यामुळे नौका एकमेकांवर आदळून धनगर कोळी यांची नौका मंगला गौरी प्रसन्न नं. IND-MH-2-MM-3159 व राहूल देवचंद्र कोळी यांची नौका सोन्याची जेजुरी नं. IND-MH-2-MM-5851 या मासेमारी नौकांना अपघात झाला आहे.
धनगर कोळी यांचे किमान रू. दीड लाखाचे तर राहूल कोळी यांचे एक लाखा पर्यंत अंदाजे नुकसान झाले असून त्याचे पंचनामे करून शासनाकडून अर्थिक मदत मिळण्यास सहकार्य करावे अशी विनंती महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीचे सरचिटणीस किरण कोळी यांनी सहाय्यक आयुक्त मत्यव्यवसाय मुंबई उपनगर यांना केली आहे.