Join us

‘आधार’च्या नावाखाली लूट

By admin | Published: August 10, 2015 1:38 AM

कागदपत्रांची पूर्तता न करता अवघ्या हजार ते दोन हजारांमध्ये आधार कार्डची विक्री करणाऱ्या टोळीचा मनसेकडून पर्दाफाश करण्यात आला

मुंबई : कागदपत्रांची पूर्तता न करता अवघ्या हजार ते दोन हजारांमध्ये आधार कार्डची विक्री करणाऱ्या टोळीचा मनसेकडून पर्दाफाश करण्यात आला. या प्रकरणी भाजपा कार्यकर्ता दिनेश पवारसह रचेंद्र स्वामीनाथ पांडे यांना नवघर पोलिसांनी फसवणुकीच्या गुन्ह्याखाली रविवारी अटक केली.मुलुंड पूर्वेकडील नानेपाडा परिसरातील मंडळाच्या कार्यालयात पांडे हा गेल्या वर्षभरापासून गुजराती इन्फोटेक लिमिटेड कंपनीअंतर्गत हे केंद्र चालवत होता. मनसेचा पदाधिकारी करन नागरे हा तरुण रविवारी सकाळी ११च्या सुमारास या केंद्रात गेला. स्वत:ची खोटी ओळख सांगून काहीही कागदपत्रे नसताना त्याला केवळ हजार रुपयांमध्ये समीर राव ताटाळे या नावावर आधारकार्ड बनवून देण्यात येत होते. या वेळी मुंबई महिला उपाध्यक्ष रिटा गुप्ता, मुलुंड मनसे विभागप्रमुख सत्यवान दळवी, मुलुंड मनविसे अध्यक्ष सागर देवरेसह त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी धाड टाकून कार्यालयावर हल्लाबोल केला. पवारसह पांडेच्या मुसक्या आवळून दोघांना पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. या प्रकरणी नवघर पोलिसांनी शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी पवारसह पांडेविरोधात गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली.