मुंबई : देशभरातील कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरूवारी विविध राज्यातील मुख्यमंत्र्यांशी व्हिडीओ काँन्फरसिंगद्वारे संवाद साधणार आहेत. ओमायक्रॉनची धास्ती, लसीकरण मोहीम आणि करोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या या आढावा बैठकीला राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे देखील सामील होणार असल्याचे सांगितले जात आहे.
महाराष्ट्रासह देशातील अनेक भागांत करोनाच्या रुग्णसंख्येत वाढ आहे. यासाठी राज्य सरकारकडून निर्बंधांसह अनेक उपाययोजना सुरु केल्या आहेत. लसीकरणाचा वेग वाढविण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. या सर्व उपाययोजनांचा आणि एकंदरीतच देशातील परिस्थतीचा आढावा पंतप्रधान नरेंद्र मोदी घेणार आहेत. या व्हिडीओ कॉन्फरसिंगमध्ये देशभरातील ३० मुख्यमंत्री सामील होणार असून राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे देखील सामील होणार असल्याची माहिती मुख्यमंत्री कार्यालयाकडून देण्यात आली आहे.
दरम्यान, महाविकास आघाडी सरकारमधील अनेक मंत्री आणि आमदारांना करोनाची लागण झाल्याचे निदान झाल्याने मागील आठवड्यातील मंत्रिमंडळ बैठक रद्द करण्यात आली होती. मात्र, या आठवड्यातील मंत्रिमंडळ बैठक बुधवारी दुपारी ऑनलाईन पध्दतीने होणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली ही आँनलाइन बैठक होणार आहे.